तापसरीने सावंतवाडीत भीतीचे सावट

अमोल टेंबकर
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी -  तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या पंधरवड्यात दिवसात तापसरीने तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे भितीचे सावट आहे. रुग्णालयांमध्येही तापसरीच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे.

सावंतवाडी -  तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. गेल्या पंधरवड्यात दिवसात तापसरीने तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे भितीचे सावट आहे. रुग्णालयांमध्येही तापसरीच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा असाच प्रकार सुरू राहिल्यास रुग्णांच्या रोषाला यंत्रणेला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्‍यात तापसरीच्या आजाराने पाच जणांचा मृत्यू झाला. कणकवली तालुक्‍यातील लेप्टोसदृष्य तापाने मृत्यू झालेल्या एकाचा समावेश करता ही संख्या सहावर पोचली आहे. एकीकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मोडकळीस आलेली असताना गोवा-बांबुळी येथे शुल्क आकारुन उपचार देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतल्याने अनेकांना त्यांची धास्ती घेतली होती; मात्र तात्पुरत्या स्वरुपात या निर्णयावर मलमपट्टी लावण्यास लोकप्रतिनिधींना यश आले. तरी जिल्ह्यात मात्र आरोग्य सेवेबाबतचा गलथान कारभार कायम आहे.

सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयात डॉक्‍टरांची वानवा आहे. अनेक पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी बोलावून सुद्धा डॉक्‍टर येत नाही, असे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनींधीचे म्हणणे आहे. या सर्व परिस्थितीत डॉक्‍टरच नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

येथील उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती तशीच आहे. सद्यस्थितीत फक्त चार वैद्यकीय अधिकारी आहेत. तापसरीची साथ असल्यामुळे रोजचे तीनशे ते चारशे रुग्ण तपासण्याबरोबर दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचार त्यांना द्यावे लागत आहेत. त्यात अतिरीक्त ताण असल्यामुळे येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे पाठविले जात आहे; मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

तालुक्‍यात फक्त तापसरीच्या आजाराने आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मळगाव येथील सतेज सखाराम सावंत यांचा तापसरीच्या आजारानंतर प्लेटलेटस कमी झाल्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तळवडे येथील योगिता हनुमंत गोडकर तर सोनुर्लीतील सिध्दार्थ आरोंदेकर, आंबेगाव येथील संदिप पाटील या शाळकरी मुलांचा तापसरीचे नेमके निदान न झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. एवढा प्रकार होवून सुद्धा याबाबत आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकात नाराजीचे सुर आहेत.

जिल्ह्यात आणि विशेषत: सावंतवाडीत तापसरी म्हणून आढळून आलेले रुग्ण हे डेंग्यू आणि लेप्टाचे असण्याची शक्‍यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनकडून व्यक्त होत आहे. सावंतवाडीत सुद्धा तापसरीचे प्रमाण वाढत आहे. यातील बरेचसे रुग्ण हे पुण्यात काम करणारे आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरीकांनी सतर्क राहावे. वेळीच उपचार करावेत.
- डॉ. सागर जाधव,
वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय सावंतवाडी

तापसरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य खात्याला हायअलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बाधीत रुग्ण आढळले आहेत त्या परिसरातील लोकांना औषधे पुरवणे, त्यांच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आहेत. आवश्‍यक त्या सुचना संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्याचे काम सुरू आहे. या कामात कोणाचेही दुर्लक्ष खपवून घेणार नाही अशा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.
- सौ. रेश्‍मा सावंत, अध्यक्ष जिल्हा परिषद

आरोग्य विभाग अलर्ट
तापसरीचे रुग्ण वाढत आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभाग सतर्क आहे. ज्या ठिकाणी बाधीत रुग्ण आढळत आहेत. त्या परिसरातील लोकांची तपासणी करुन त्यांना औषध पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे; मात्र नातेवाईकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. साधा ताप आल्यानंतर सुद्धा जवळच्या रुग्णालयात जावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Sindhudurg News Tapsari in Sawantwadi