तिथवली वाहतूक वादावरील बोलणी फिस्कटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

वैभववाडी - महामार्ग चौपदरीकरणासाठी येथून होणाऱ्या खडी वाहतूक वादावर आज केसीसी कंपनी अधिकारी आणि ग्रामस्थांतील चर्चा फिस्कटली. यावेळी ग्रामस्थांनी खडीसाठी होणाऱ्या स्फोटामुळे घरांच्या भिंतीना तडे गेल्याचे व तेथील धरणालाही धोका असल्याचा आरोप केला.

वैभववाडी - महामार्ग चौपदरीकरणासाठी येथून होणाऱ्या खडी वाहतूक वादावर आज केसीसी कंपनी अधिकारी आणि ग्रामस्थांतील चर्चा फिस्कटली. यावेळी ग्रामस्थांनी खडीसाठी होणाऱ्या स्फोटामुळे घरांच्या भिंतीना तडे गेल्याचे व तेथील धरणालाही धोका असल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी वाहतुक सुरू करण्याची केलेली मागणी ग्रामस्थांनी फेटाळुन लावली. त्यामुळे आता 5 जुलैच्या ग्रामसभेमध्येच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

चौपदरीकरणाची ठेकेदार कंपनी केसीसीचा तिथवली येथे स्टोन क्रशर आहे. या क्रशरवरून दिवसभरात कित्येक अवजड डंपरमधून खडीची वाहतुक सुरू असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील वाहतुक सुरूच होती. या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण -गगनबावडा मार्गावरील तिथवलीपर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी कंपनीची डंपर वाहतुक रोखली होती.

त्यानंतर पुन्हा आलेले डंपर रिकामीच परत पाठविले होते. त्यामुळे कंपनीचे अधिकारी हरपाल सिंग आज ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी तिथवली ग्रामपंचायतीमध्ये आले. यावेळी नासीर काझी, सरपंच सुरेश हरयाण, संतोष हरयाण, महादेव हरयाण, ब्रह्मानंद हरयाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी डंपर वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा अधिकारी श्री. सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. पावसाळ्यात अशीच वाहतुक सुरू राहिल्यास रस्ता शिल्लकच राहणार नाही, असे सांगितले. यावेळी श्री. सिंग यांनी रस्त्याला पडलेले खड्डे सिमेंटने भरण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले. खडी उत्खनन करताना मोठे स्फोट केल्यामुळे गावातील काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. हे नुकसान कोण भरून देणार असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला असता श्री. सिंग यांनी घरांच्या झालेल्या नुकसानीचे तलाठ्यामार्फत पंचनामे करून घ्या, त्याचे नुकसान दिले जाईल, असे आश्‍वासन दिले. याशिवाय गावातील शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

काही ग्रामस्थांनी स्फोटामुळे तिथवली धरणाला धोका असल्याचा दावा केला. या धरणावरच गावातील शेती अवलंबुन आहे. जर धरणाचे नुकसान झाले तर पुर्ण गाव पाण्याअभावी कोरडे पडेल अशी भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली; मात्र श्री.सिंग यांनी धरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्ट केले. खडी वाहतुक करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली; परंतु ग्रामस्थांनी त्यांची मागणी धुडकावुन लावली.

तब्बल तीन तास श्री. सिंग आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली; परंतु त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर श्री.सिंग यांनी जर ग्रामस्थांचा विरोध असाच राहीला तर आपल्याला जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे यासंदर्भात दाद मागायला लागले, असे सांगितले.

""5 जुलैच्या ग्रामसभेतच निर्णय घेतला जाईल.तोपर्यत कंपनीने वाहतुक करू नये, अशी आमची भुमिका आहे.
- सुरेश हरयाण,
सरपंच तिथवली

रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यास सुरवात केली आहे. घरांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाईही दिली जाईल. यासाठी तलाठ्यांमार्फत पंचनामे करावेत. केसीसी कंपनी इथल्या शाळांना सुविधा द्यायलाही तयार आहे. धरणार कोणताही धोका उद्‌भवणार नाही. याची काळजी आम्ही घेवू.
- हरपाल सिंग,
अधिकारी, केसीसी कंपनी

Web Title: Sindhudurg News Tithavali traffic issue