देवबाग समुद्रात बुडून पुण्यातील दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मालवण - देवबाग संगम येथील समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. निखिलेश जालिंदरसिंग रजपूत (वय १०, मूळ रा. धुळे, सध्या रा. पुणे) व  मानसी मनोज चव्हाण (वय १३, मूळ रा. सांगली, सध्या रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत.

मालवण - देवबाग संगम येथील समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. निखिलेश जालिंदरसिंग रजपूत (वय १०, मूळ रा. धुळे, सध्या रा. पुणे) व  मानसी मनोज चव्हाण (वय १३, मूळ रा. सांगली, सध्या रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. यात एका लहान मुलीस वाचविण्यात यश आले आहे. मुलांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

पुणे येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले रजपूत, चव्हाण व निवदेकर ही तीन कुटुंबे पर्यटनासाठी मालवणात आले होते. घुमडे येथील पर्यटन निवासाच्या ठिकाणी ते वास्तव्यास होते. आज दुपारी ही तिन्ही कुटुंबे आपल्या मुलांसह देवबाग संगम येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास गेले. यात जालिंदरसिंग जयसिंग रजपूत, पत्नी योगिता, मुलगा निखिलेश, मुलगी भार्गवी (वय ५), मनोज बबन चव्हाण, पत्नी अर्चना, मुलगी मानसी, अनघा (वय ६) तसेच निवदेकर कुटुंबीय असा बारा जणांचा समावेश होता. हे सर्वजण देवबाग संगम येथील समुद्राच्या पाण्यात उतरले.

मुले पाण्यात खेळत असल्याने पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, यातील निखिलेश रजपूत, मानसी चव्हाण, अनघा चव्हाण या चिमुरड्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही घटना किनाऱ्यालगत असलेल्या के. डी. पाटील, उज्ज्वला पाटील या वृद्ध दाम्पत्यास दिसली. त्यांनी आरडाओरड करत तेथे धाव घेत अनघा हिला बाहेर ओढले; मात्र मानसी व निखिलेश हे दोघेही पाण्यात बुडाले. 

मुले समुद्राच्या पाण्यात बुडाल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थ मकरंद चोपडेकर, बबली चोपडेकर, दत्ता चोपडेकर, मनोज चोपडेकर, दत्ता धुरी, भाई चिंदरकर, राजन राऊळ, पंकज धुरी, नागेश चोपडेकर, योगेश केळुसकर, हरेश राणे, केतन तोरसकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यात बुडालेल्या निखिलेश व मानसी या दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून पाचारण करण्यात आले. मात्र, पर्यटनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने १०८ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोचणे शक्‍य नसल्याचे दिसताच स्थानिक ग्रामस्थ मकरंद चोपडेकर यांनी दुचाकीने निखिलेश याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मानसी हिला रुग्णालयात दाखल केले.

सूचना फलकांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष...
किनारपट्टी भागातील देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ याठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत, मेरीटाईम बोर्डाच्यावतीने ‘पर्यटकांनी समुद्रात उतरू नये’, अशा सूचनांचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत; मात्र या फलकांवरील सूचनांकडे पर्यटकांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्यानेच असे अपघात घडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाई मांजरेकर, देवबाग ग्रामसेवक युवराज चव्हाण, भाऊ सामंत, दीपक पाटकर, पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, विवेक नागरगोजे, संतोष गलोले, अमोल महाडिक यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. निखिलेश व मानसी या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच रजपूत व चव्हाण कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलांचा मृत्यू पाहिल्यानंतर या दोन्ही कुटुंबीयांना जबर धक्का बसला. या दोन्ही मुलांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

Web Title: Sindhudurg News two dead in devbag sea