अवैध मासेमारी करणाऱ्यांची नावेच जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मालवण - पर्ससीननेटच्या मासेमारीबरोबरच जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरीत्या प्रखर झोतातील मासेमारी सुरू आहे. यात येथील तीन मत्स्य उद्योजकांचा सहभाग असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्या  निदर्शनास आणून दिले.

मालवण - पर्ससीननेटच्या मासेमारीबरोबरच जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरीत्या प्रखर झोतातील मासेमारी सुरू आहे. यात येथील तीन मत्स्य उद्योजकांचा सहभाग असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्या  निदर्शनास आणून दिले. संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

येथीलच तीन मच्छीमारांची नावे जाहीर झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी सुचविलेल्या कन्याशाळा येथील इमारतीची पाहणी करून ही जागा निश्‍चित करण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्या.

मालवण दौऱ्यावर आलेल्या श्री. नाईक यांनी येथील सहायक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयास भेट दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुशे, दिलीप घारे, पंकज सादये, बाबी जोगी यांच्यासह पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या अवैधरीत्या प्रखर झोतातील मासेमारी सुरू आहे. या मासेमारीला केंद्राने बंदी घातली असतानाही मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले. यावेळी चर्चेत मालवणातीलच तीन मत्स्य व्यावसायिकांकडून प्रखर झोतातील मासेमारी केली जात असून त्यांची नावे आमदार नाईक यांनी सहआयुक्त जाधव यांना दिली. मच्छीमारांनी या तिघांकडूनच प्रखर झोतातील मासेमारी होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी यावेळी केली.

डिसेंबरनंतर पर्ससीननेटच्या मासेमारीस बंदी आहे. असे असतानाही आचरा, निवती-वेंगुर्ले येथे सध्या मिनी पर्ससीननेटद्वारे मासेमारी सुरू असल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी निदर्शनास आणून दिले. यावर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी पंधरवड्यापूर्वी अनधिकृत मिनी पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या आठ ते दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून यावरील दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.

पर्ससीननेटवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई केली जाते; मात्र ही मासेमारी थांबत नसल्याने संबंधितांच्या नौका तसेच पर्ससीनच्या जाळ्या सील करण्याची कार्यवाही होणे आवश्‍यक असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यानुसार नांगरून ठेवलेल्या तसेच मासेमारी करताना आढळून आलेल्या पर्ससीन नौकाधारकांच्या नौका तसेच जाळ्या अवरुद्ध करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सहआयुक्त श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले. 

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत हायस्पीड, पर्ससीनधारकांकडून अवैधरीत्या मासेमारी करताना मोठ्या प्रमाणात मासळीची लूट केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी मच्छीमारांकडून केल्यानंतरही मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जात नाही. या नौकांना पकडण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्तीसाठी हायस्पीड नौका नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे, असे स्पष्ट करण्यात आले. यावर अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनच्या नौकांना पकडण्यासाठी हायस्पीड नौका उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्‍यक प्रस्ताव तत्काळ सादर करावा. यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हायस्पीड नौका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल, असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. 

मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी आठ जागा मच्छीमारांनी सुचविल्या होत्या. त्यानुसार शहरातील कन्याशाळा येथील जागेची आज आमदार नाईक यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी जागा निश्‍चितीची कार्यवाही तत्काळ करून आवश्‍यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना केल्या.

बदनामी नको, बदली करा
येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मच्छीमारांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या प्रकरणी  श्री. वस्त यांनी आपण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यापासून गेली अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. मच्छीमारांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे आपली बदनामी न करता बदली करा, असे स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg News Vaibhav Naik press