‘इडी’च्या चौकशीमुळेच राणेंचे भाजपकडे लोटांगण - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कुडाळ - नारायण राणे आता बिनकामाचे मंत्री आहेत. त्यांनी कुंडल्या मांडण्याचा धंदा सुरू केला आहे. हिंमत असेल तर त्यांनी कुंडल्यांसह एकाच व्यासपीठावर यावे आणि आम्ही विनाकुंडल्या येऊ. ‘इडी’च्या चौकशीमुळेच ते भाजपकडे लोटांगण घालायला गेले, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी येथे केला.

कुडाळ - नारायण राणे आता बिनकामाचे मंत्री आहेत. त्यांनी कुंडल्या मांडण्याचा धंदा सुरू केला आहे. हिंमत असेल तर त्यांनी कुंडल्यांसह एकाच व्यासपीठावर यावे आणि आम्ही विनाकुंडल्या येऊ. ‘इडी’च्या चौकशीमुळेच ते भाजपकडे लोटांगण घालायला गेले, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी येथे केला.

श्री. राऊत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘गेल्या दहा पत्रकार परिषदांमध्ये राणेंना शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार यांच्यावर टीकेपलीकडे काहीच दिसत नाही. राणेंच्या कारकिर्दीत राजकीय कार्यकर्त्यांचे खून झाले. आमच्या राजकीय कारकिर्दीत साधी जखमही झाली नाही. अशांत जिल्हा आता शांततामय झाला आहे. राणेंनी लोकसभा-विधानसभेत आपटी खाल्ल्यानंतर कुंडल्या मांडण्याचा धंदा सुरू केला आहे. हिंमत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर यावे. यापूर्वी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना आमने-सामनेचे आव्हान दिले होते; मात्र ते आले नाहीत. आता मी त्यांना आव्हान देतो. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य 
वाढत आहे. ते राणेंना टोचत आहे. शिवसेना द्वेषाची कावीळ त्यांना झाली आहे. आमच्या माध्यमातून झालेली विकासकामे त्यांना कधीच दिसणार नाहीत.’’

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात एक टक्का सिंचन आहे. भविष्यात येथे जलसंधारणाची कामे करण्याचा मानस आहे. यातून आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीची कामे आता पावसाचा जोर थांबल्याने उन्हाळी डांबर वापरून करण्यात येत आहेत. चौपदरीकरण काम रत्नागिरीत नोव्हेंबरपासून, तर सिंधुदुर्गात डिसेंबरपासून सुरू केले जाईल. घर बांधणीबाबतची अट हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम वैभव नाईक, राजन साळवी, सदानंद चव्हाण या आमदारांच्या माध्यमातून होत आहे.’’

या वेळी आमदार वैभव नाईक, संजय पडते, मंदार शिरसाट, राजन जाधव, वर्षा कुडाळकर, देवानंद काळप, संजय भोगटे, शिल्पा घुर्ये, श्रेया गवंडे, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्‍वर, मेघा सुकी, अर्चना तायशेटे, सतीश कुडाळकर आदी उपस्थित होते.

भाजपचे राज्यमंत्री निवडणुकीपुरतेच
आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘‘भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहेत. येथील विकासकामे त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. ते फक्त नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीपुरते मर्यादित आहेत.’’

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ओल्या दुष्काळाची मागणी
श्री. राऊत म्हणाले, ‘‘पावसामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याने दोन्ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सरसकट हेक्‍टरी २५ हजारांचे अनुदान तातडीने द्यायची मागणीही करण्यात आली आहे.’’
 

Web Title: Sindhudurg News Vinayak Raut Press