सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; विस्कळीत कारभारामुळे तिजोरी रिकामी

तिजोरीत खडखडाट निर्माण होवून संस्थानची देणी वाढली.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; विस्कळीत कारभारामुळे तिजोरी रिकामी

सावंतवाडी : चौथे खेमसावंत उर्फ बापूसाहेब यांनी काहीकाळ लक्ष देवून कारभार हाकला. नंतर मात्र त्यांचे कारभारात मन रमेना. साहजीकच दरबारातील इतर लोकांचे महत्त्व वाढले. यामुळे कारभारात विस्कळीतपणा आला. याचा फटका लोकांना बसू लागला. तिजोरीत खडखडाट निर्माण होवून संस्थानची देणी वाढली. साहजिकच पुन्हा इंग्रजांनी हस्तक्षेप केला.

नर्मदाबाई आणि सावित्रीबाई पावशीत गेल्यानंतर बापूसाहेबांनी सावंतवाडीचा कारभार स्वतंत्रपणे हातात घेतला. सुरूवातीचे दिवस ते रोज पाच-सहा घटका दरबारात असायचे. त्यामुळे कारभार नीट चालला होता. इंग्रजांनी हस्तक्षेप करून पावशीतून दोन्ही बाईसाहेबांनी सुरू केलेले समांतर सरकार बंद करायला लावले. यानंतर त्या दोघीही परत सावंतवाडीतील माठ्यात रहायला आल्याचे संदर्भ आधी आलेच आहेत. त्या परत सावंतवाडीत येईपर्यंत बापूसाहेब चांगल्या प्रकारे कारभार पाहत होते. त्या दोघीही माठ्यात आल्यावर बापुसाहेब स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यांनी परत सावंतवाडीच्या राजवाड्यात (कोट) येण्याविषयी विनंती केली; मात्र त्यांनी ‘बरे आहे’ इतकेच उत्तर दिले. त्या कोटात मात्र परत आल्या नाहीत.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; विस्कळीत कारभारामुळे तिजोरी रिकामी
कशेडी बोगद्याचा 'तो' व्हिडीओ फेकच; काम प्रगतीपथावर

या घटनेपासून बापूसाहेबांचे कारभारावरचे मन उडाले. त्यांनी दरबारात येणे कमी केले. ते देवधर्मात मग्न राहू लागले. याचा परिणाम राज्यकारभारावर दिसू लागला. हाताखालच्या लोकांचे महत्त्व वाढल्याने घोटाळे सुरू झाले. राजेसाहेबांच्या मर्जीतील लोक वसुलीसाठी गाववार चिठ्ठ्या देवून जावू लागले. याचा फटका लोकांना बसू लागला. वसुलीत घोटाळा झाल्याने तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. त्याचा सगळ्यात मोठा परिणाम संस्थानच्या देणी भागवण्यावर झाला. चंद्रोबा सुभेदार यांना दिलेली नेमणूक, संस्थानचे कर्ज, कोल्हापूरचा तनखा या रकमा फेडणे अवघड बनले. यातून थकबाकी वाढत गेली.

या सगळ्यात ब्रिटीशांची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे थकबाकीच्या तक्रारी त्यांच्याकडे होवू लागल्या. कोल्हापूर संस्थानला देणे असलेल्या रकमेचा प्रश्‍न निर्माण झाला. यावेळी सावंतवाडी सरकारने रकमेसाठी जामीन देण्याचे कबूल केले; मात्र ब्रिटीशांनी यात वेगळी तोड काढली. सावंतवाडीकर कोल्हापूर सरकारला दरवर्षी जितकी रक्कम देणे होते तितक्या उत्पन्नाचा दक्षिण महाराष्ट्रातील आपल्या मुलुखापैकी भाग ब्रिटीशांनी कोल्हापूरला दिला. याच्या बदल्यात संबंधित रक्कम दरवर्षी सावंतवाडीकरांनी ब्रिटीशांना द्यावी असे ठरले. थकबाकी वाढत होती; मात्र बापूसाहेब कारभारात लक्ष देत नव्हते. तिजोरीत खडखडाट होता. ब्रिटीशांचा वसुलीसाठीचा तगादा वाढत गेला.

बांद्याचे किल्लेदार चंद्रोबा सुभेदार यांना सावंतवाडीकरांनी ठरवून दिलेली नेमणूक न पोहोचल्याने त्यांची माणसे गावोगाव वसुलीला फिरू लागली. याचा लोकांना त्रास होवू लागला. यातही रत्नागिरीचे कलेक्टर गिलबर्ट मुर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी चंद्रोबांच्या देण्याची फेड न केल्यास त्यांना काही मुलूख तोडून द्यावा असे पत्र सावंतवाडीकरांना लिहिले. यावर सावंतवाडीकरांनी ब्रिटीशांकडे म्हणणे मांडले. त्यांनी चंद्रोबा यांची वागणूक संस्थांनशी सरळपणाची नसल्याचा दावा केला. ते सरकारच्या चाकरी असलेल्या लोकांना पकडून नेतात. सरकारने कैद केलेल्या लोकांच्या बेड्या तोडून त्यांना सोडून देतात.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; विस्कळीत कारभारामुळे तिजोरी रिकामी
नेत्यांनो, यायचे असल्यास हाती झाडू घेऊन या नाहीतर....

व्यापाऱ्यांना त्रास देतात असे त्यांचे म्हणणे होते. इतके असूनही त्यांना पैसे द्यायचे असल्यास वसुलीचे गावगन्ना रोखे त्यांना दिले जाते. त्यांनी वसुली करून पैसे घ्यावेत असा तोडागा सावंतवाडी सरकारने दिला; मात्र असे केल्यास लोकांना त्रास होणार असे ब्रिटिशांचे म्हणणे पडले. याशिवाय प्रसिद्धगडाचा तनखा वेळोवेळी घेतलेली कर्ज मिळून सावंतवाडी सरकार ब्रिटीशांची बरीच मोठी रक्कम देणे लागत होते. यासाठी संस्थांनमधील ५३ खेड्यांची मामलत (वसुलीचा अधिकार) रघुनाथ नारायण म्हापसेकर यांना देण्याचे ठरले.

म्हापसेकर यांनी देणे रक्कम ब्रिटिशांच्या तिजोरीत जमा करावी, असा हा ठराव होता; मात्र चंद्रोबा व इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे म्हापसेकर यांना वसुली करता येईल. त्यामुळे कराराप्रमाणे ते ब्रिटिशांना रक्कम देवू शकले नाहीत. नंतर ही मामलत माधवराव शिर्के यांना देण्यात आली. त्यांनी एकाचवेळी २५ हजार रूपये भरणा करतो, असे कबूल केले; मात्र तेही वसुली करू शकले नाहीत. त्यांना पैसे जमा करण्यासाठी ताकीद देण्यात आली. शेवटी त्यांनी मामलतीचे अधिकार दुसऱ्याकडे गहाण ठेवून २५ पैकी १० हजाराची रक्कम ब्रिटिशांकडे जमा केली.

पुढे मात्र ते पैसे देईनात. त्यामुळे हा अधिकार पुन्हा १८२९ मध्ये म्हापसेकर यांना देण्यात आला. त्यांनाही वसुलीत यश येईना. शेवटी ब्रिटिश सरकारने चंद्रोबा यांची थकीत रक्कम देण्यासाठी व आपले येणे वसूल करण्यासाठी पाट, आजगाव, हवेली व बोर्डवे या तर्फातील काही गावे जप्त करण्याचा जाहीरनामा १४ जून १८३०ला प्रसिद्ध केला. यानंतर सावंतवाडी सरकारने तातडीने हालचाली करत थकीत रकमेची परतफेड केली. पुन्हा वेळच्यावेळी पैसे देण्याचे कबूल केले.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; विस्कळीत कारभारामुळे तिजोरी रिकामी
7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले

बंडाची चाहूल

बापूसाहेब कारभारात लक्ष घालत नसल्याने हाताखालचे लोक वसुलीसाठी फिरू लागले. याचा फटका रयतेसह किल्लेदारांनाही बसत होता. या सगळ्याला कंटाळून १८२८ मध्ये महादेव गडाचे पूर्वीचे किल्लेदार फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंतवाडी सरकार विरूद्ध बंड पुकारला. त्यांनी महादेवगड किल्ल्यावर हल्ला केला. हे बंड मोडण्यासाठी सावंतवाडीकरांनी सैन्य पाठवले; मात्र तांबुळकर यांनी या सैन्याला मागे फिरायला लावून किल्ल्यावर ताबा मिळवला. शेवटी सरकारने ब्रिटिशांकडे मदत मागितली. अखेर हे बंड मोडण्यासाठी ब्रिटिशांनी एक फलटण पाठवली. ते सैन्य येताच बंड करणारे किल्ला सोडून लगतच्या इचलकरंजी संस्थानात पळून गेले. १८३० पर्यंत म्हणजे दोन वर्षे ही धामधूम सुरू होती. पुढे झालेल्या सावंतवाडी संस्थानातील बंडाची ही चाहूल ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com