सिंधुदुर्गात नारळ पाण्यावरील प्रकल्पासह नवे चार प्रकल्प प्रस्तावित 

Rucha Kamat
Rucha Kamat

बांदा - सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारीत चार नवे प्रकल्प येवू घातले आहेत. यात मिनरल वॉटरसह निरा प्रकल्पाचाही समावेश आहे. यात स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामावून घेण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या मदतीने कैजन ग्रुप हे प्रकल्प साकारणार आहे. 

सध्या जिल्ह्यात रोजगार नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. ही स्थिती लक्षात घेवून कोनशी गावची सुपुत्री तथा महाराष्ट्राची युवा महिला उद्योजिका ऋता प्रशांत कामत यांनी जिल्ह्यात कैजन ग्रुपच्या माध्यमातून व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून पर्यटनावर व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित चार नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील स्थानिक महिला तसेच शेतकऱ्यांना सामावून घेण्यात येणार आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पांसाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांशी 100 कोटी रुपयांचे करार देखील करण्यात आले आहेत. 

कैजन ग्रुपचीच कंपनी असलेल्या कोनास बेव्हरेजिस प्रायव्हेट लिमिटेडच्या कोनशी येथील मिनरल वॉटर प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीने गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर संशोधन करून उच्च दर्जाचे पाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. 

नवीन सुरू होणाऱ्या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील महिला तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. सौंदर्य उत्पादने, कोकोनट कॉयर मॅट्रेस कार्पेट (काथ्यापासून पाय पूसणी), नॅचरल वॉटर (नैसर्गिक पाणी) आणि पर्यटनावर आधारित हे प्रकल्प असतील. याबाबतची सविस्तर माहिती उद्योजिका कामत यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

त्या म्हणाल्या, ""कैजन ग्रुपने अनेक सरकारी कंपन्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळांशी सहकार्यासाठी बोलणी केली आहेत. सर्व कंपन्यांनी कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. येथील प्रकल्पातून निर्माण होणारे उत्पादन हे जागतिक दर्जाचे असावे यासाठी अनेक राष्ट्रीय व जागतिकस्तरावरील कंपन्यांसोबत व्यावहारिक करार देखील केले आहेत.'' 

मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत 100 करोड रुपयांच्या व्यावहारिक प्रक्रियेवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यावेळी महाखादी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकेत्ता, एमएसएसआयडीसीचे प्रबंधक निदेशक संतोष कुमार उपस्थित होते. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. 

पहिला प्रकल्प नारळातील पाण्यावर आधारित

श्रीमती कामत यांनी सांगितले, की पहिला प्रकल्प हा नारळावर आधारित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र त्याला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात आहे. कैजन ग्रुपच्या माध्यमातून स्वास्थ्यबायोवेलनेस प्रा. लिमिटेड कंपनीच्यावतीने नारळ पाण्यावर आधारित नारियल नीरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक व जैविक खाद्य व सौंदर्य उत्पादने बनविण्यात येणार आहेत. याला जागतिकस्तरावर मोठी मागणी आहे. आतापर्यंत नारळावर संशोधन झाले नव्हते; मात्र यावर पूर्णपणे संशोधान करून त्याद्वारे इनोव्हेटिव्ह ऑरगॅनिक चिनी (जैविक साखर), गूळ, मध, व्हिनेगर तसेच सौंदर्य प्रसाधन, स्पा, बेबी उत्पादने बनविली जाणार आहेत. नारियल निराच्या माध्यमातून विविध उत्पादने बनविण्याचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पुढील आठ महिन्यांत उत्पादने सुरू होणार आहेत.

नारळाच्या काथ्यापासून कार्पेट, मॅट्रेस

याव्यतिरिक्त नेटफार्म इनोव्हेशन नारियल कंपनीच्या माध्यमातून नारळाच्या काथ्यापासून कार्पेट व मॅट्रेस बनविण्यात येणार असून ही उत्पादने पूर्णपणे इकोफेंडली (पर्यावरणपूरक) असतील. दक्षिण भारतानंतर कोकोनट कॉयरचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न आहे. यामुळे जिल्ह्यातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांची कमाई दहापटीने वाढणार आहे. 

जलपर्यटनालाही वाव 
जलपर्यटन प्रकल्पाद्वारे ग्रुपची कंपनी मेन्नर अँड स्किल्स इंटिग्रेटेड सर्व्हिसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन मोठ्या नद्यांमध्ये हाऊसबोट, डबल डेकर सफारी बोट, होप ऑन होप बोट, साहसी क्रीडाप्रकार आणि सर्व सुविधांनीयुक्त पाण्यातील तरंगते हॉटेल आदी सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील जलपर्यटनाला देखील वाव मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तेरेखोल नदीची निवड करण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com