
सिंधुदुर्ग : जगाची सफर... जोडीने!
विजयन आणि मोहना हे केरळमधील मध्यमवर्गीय दाम्पत्य. अतिशय साधेपणाने दोघेजण आयुष्य जगत. एरणाकुलममध्ये ते दोघेजण गेली ४७ वर्षे चहाचे छोटेसे दुकान चालवत होते. चहा सोबतच काही स्नॅक्सही तिथे विक्रीला ठेवलेले होते. सर्वसामान्य भारतीय मध्यमवर्गीय जोडप्याप्रमाणे त्यांचेही आयुष्य सुरू होते. परंतु, विजयन आणि मोहना या दोघांनाही जग बघण्याचा फिरण्याचा अतिशय ध्यास होता.
लहान असताना विजयन यांनी धान्य चोरले होते आणि त्या पैशांतून ते फिरायला बाहेर पडले. नंतरही त्यांच्या डोक्यातील फिरण्याचे, जग पाहण्याचे वेड कमी झाले नाही. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मोहना यांनी आपल्या खेड्यातून एरणाकुलमपर्यंतचा प्रवास केला होता. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला प्रवास. दोघांची मिळकत साधारणच होती. जग फिरायचे म्हटल्यावर भरपूर पैसे लागणार, हा समज त्यांनी खोटा ठरवला. अल्प पैशातही तुम्ही प्रवास करू शकता, जग पाहू शकता, हे या दोघांनी सिद्ध केले. दोघांनीही ठरवले की, आपण रोज आपल्या मिळकती मधील थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे.
त्याप्रमाणे दोघेही रोज तीनशे रुपये बाजूला ठेवत असत. जमलेल्या पैशांतून त्यांनी १९८८ साली पहिला हिमालयातील प्रवास केला. त्यानंतर २००७ साली पहिल्यांदा ते इजिप्तला गेले. इथून पुढे ते फिरतच राहिले. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, युरोप अशा देशांमध्ये त्यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांना विविध अनुभव आले. दोन-तीन प्रवास केल्यानंतर मोहना आणि विजयन यांना लोक ओळखू लागले. वयाच्या साठीनंतर जग बघायला निघालेलं हे भारतीय सर्वसामान्य जोडपं, जगातल्या अनेक माध्यमांचं लक्ष त्यांनी स्वतःकडे वेधून घेतलं. ते दोघेजण साठलेल्या पैशांसोबतच थोडे पैसे उधार घेत.
फिरून आल्यानंतर आणखी जादा कष्ट करून ते पैसे फेडत. आपल्या टी स्टॉलवर ते दोघेजण कोणताही नोकर न नेमता स्वतःच काम करत. पैसे साठले की पुन्हा पुढच्या प्रवासाची तयारी करत. आजवर त्यांना अनेक दिग्गज लोकांनी मदत केली आहे. केरळमधील फिल्म स्टार या जोडप्याला आवर्जून भेटायला येत. केरळ सरकारने तर ‘टूरिस्ट जोडपे’ म्हणून त्यांना खूप सन्मान आणि प्रसिद्धी दिली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी या जोडप्याला ५० हजार रुपये बक्षीस दिले.
जगात प्रत्येकाला कशाला ना कशाचे वेड असते, पण आपण ते वेड दडवून ठेवतो. आपल्या आयुष्यातील वेडाचा पाठलाग करा, असं विजयन सांगत असत. वयाच्या ७१ व्या वर्षी विजयन यांनी हार्ट अॅटॅकमुळे जगाचा निरोप घेतला. परंतु आपले स्वप्न त्यांनी तत्पूर्वी पूर्ण केले होते. दोघेजण जपान पाहायची तयारी करत होते. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता मोहना एकट्याच परंतु विजयन यांच्या आठवणींसह जपानला जाणार आहेत. माणसाला कोणतीही इच्छा असो, ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते, हेच खरे!
यश... जगातील तेवीस देश पाहिले.
संघर्ष... चहाचे छोटे दुकान चालवून पैसे जमा केले.
Web Title: Sindhudurg World Tour Pairs Indian Middle Class Couples
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..