Sindhudurga : बांदा-दोडामार्ग रस्त्यावरून भाजप आक्रमक

अधिकाऱ्यांना घेराओ ; काम मंजूरीस दोन दिवसांची डेडलाईन
kokan
kokansakal

सावंतवाडी : बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज पुन्हा एकदा भाजपाने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराओ घातला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कदापिही कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावर आपण उद्याच याप्रश्नी मंत्रालयात जाऊन टेंडर मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले; मात्र दोन दिवसात लेखी उत्तर न मिळाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांनी दिला.

बांदा-दोडामार्ग या रस्त्याची झालेली अवस्था आणि त्याकडे झालेले दुर्लक्ष पाहता प्रशासनाकडून किंवा शासनाकडून याबाबत काहीच हालचाली होत नाही, अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी खोटे आश्वासने देऊन आम्हाला तसेच जनतेला फसवले जात आहे. स्थानिक आमदारांकडून तब्बल तीनवेळा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही गेल्या तीन वर्षापासून वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डयातूनच प्रवास करावा लागत आहे. वेळोवेळी याबाबत बांधकामचे लक्ष वेधूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने आज पुन्हा एकदा भाजपाकडून बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांच्यासह नगराध्यक्ष संजू परब, शेखर गावकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, पालिका आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बांदा सरपंच अक्रम खान, मकरंद तोरस्कर, अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांनी उपस्थित बांधकामचे अनामिका चव्हाण व राजन चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जर या रस्त्याच्या कामाचे टेंडर झाले नाही तर आमदार केसरकर यांना निवडणुकीपूर्वी घेऊन आपण भूमिपूजन कसे काय केले ? निदान तीन वर्षांमध्ये नूतनीकरणाचे सोडा; पण निदान खड्डे बुजवले असते तरी चांगले झाले असते. आज या रस्त्यावरून गाडी चालवणे सोडा नुसते चालणेही कठीण बनले आहे. अधिकाऱ्यांकडून स्थानिकांना खोटी आश्वासने व माहिती दिली जात असल्याचा आरोप केला. यावर श्रीमती चव्हाण यांनी या रस्त्याच्या कामाचे टेंडर प्रोसेस प्रक्रिया पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. हे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत असून यामध्ये काही त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपण उद्या मंत्रालयात जाणार असून याबाबत योग्य तो तोडगा काढणार आहे; मात्र या रस्त्याच्या कामाला एकदा मंजुरी मिळताच दुसऱ्या दिवसापासून तात्काळ काम हाती घेतले जाणार आहे, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com