सिंधुदुर्गाचा काजू उद्योग कोलमडला

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सावंतवाडी - काजूवरील आयात शुल्क कमी झाल्याचा मोठा फटका सिंधुदुर्गातील काजू उद्योगाला बसला आहे. परदेशातील कच्चा काजू मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने काजू गराचा दर उतरला आहे. यामुळे जिल्ह्यातील काजू व्यावसायिकांना उत्पादन खर्चही मिळवणे कठीण बनले आहे. याचा परिणाम येत्या काजू हंगामातील खरेदीवर दिसण्याची शक्‍यता आहे.

सावंतवाडी - काजूवरील आयात शुल्क कमी झाल्याचा मोठा फटका सिंधुदुर्गातील काजू उद्योगाला बसला आहे. परदेशातील कच्चा काजू मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने काजू गराचा दर उतरला आहे. यामुळे जिल्ह्यातील काजू व्यावसायिकांना उत्पादन खर्चही मिळवणे कठीण बनले आहे. याचा परिणाम येत्या काजू हंगामातील खरेदीवर दिसण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास गेल्या तीन वर्षात काजू दर वाढल्याने मोठ्या प्रमाणात काजू बागायतीत गुंतवणूक केलेले बागायतदार अडचणीत येणार आहेत. 

गेली दोन वर्षे कच्च्या काजूचा दर १७० ते १७५ रुपये प्रतिकिलो असा मिळत होता. पूर्वी हा दर ८० ते १०० रुपये असायचा. ब्राझीलसह इतर देशातून भारतात मोठ्या प्रमाणात काजू बी ची आयात होत असे; मात्र केंद्राने आयात शुल्क ५ टक्‍के केल्यामुळे ही आयात नियंत्रित झाली होती. साहजिकच स्थानिक काजू बी ला चांगला दर मिळत होता.

काजू  दृष्टिक्षेपात

  •  देशातील लागवडीखालील क्षेत्र - १०.२७ लाख हेक्‍टर
  •  देशातील सरासरी उत्पादन - साडेसात लाख टन
  •  देशातील प्रतिहेक्‍टरी उत्पादकता - ७०० ते ८०० किलो
  •  महाराष्ट्रातील काजू लागवड क्षेत्र - १.८६ लाख हेक्‍टर
  •  सिंधुदुर्गातील काजू लागवडीखालील क्षेत्र - ६० हजार हेक्‍टर
  •  महाराष्ट्रातील उत्पादन - २ लाख टनांपेक्षा जास्त
  •  महाराष्ट्रातील उत्पादकता - १२०० ते १३०० किलो प्रति हेक्‍टर
  •  महाराष्ट्रात काजूच्या संकरित जातींची संख्या - ९
  •  कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या जाती -  वेंगुर्ले १, वेंगुर्ले ४, वेंगुर्ले ६, वेंगुर्ले ७, वेंगुर्ले ८, वेंगुर्ले ९

काजूचे वाढलेले मार्केट पाहून सिंधुदुर्गात अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीजमिनीसह डोंगर भागात काजूची लागवड केली. गेल्या अर्थसंकल्पात केंद्राने काजूवरील आयात शुल्क कमी करत अडीच टक्‍क्‍यावर आणले. जिल्ह्यातील काजू कारखानदारांनी या आधीच स्थानिक काजूची १७० ते १७५ इतक्‍या सरासरी दराने खरेदी केली होती. साधारण १ किलो काजू गरांसाठी ४ किलो काजू बी व प्रक्रिया शुल्क मिळून किमान ८०० रूपये खर्च येतो. यामुळे मुद्‌दल सुटायला इतका तरी दर मिळणे गरजेचे असते. 
गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रासह गोव्यात ब्राझील व इतर भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा काजू दाखल झाला आहे. याचा दर ८० ते ८५ रूपये प्रतीकिलो इतका कमी आहे. त्यापासून तयार केलेला काजू गोव्याच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाला. तामिळनाडू आणि केरळमधील प्रक्रिया उद्योजकांनी हा काजू गोव्यात उतरवला आहे. याचा दर प्रतिकिलो ७२० च्या दरम्यान आहे.

असा वाढला काजू
मग्रारोहयो अंतर्गत कृषी विभागामार्फत वर्ष २०१२-१३ ते २०१६-१७ अखेर झालेली काजू क्षेत्रवाढ हेक्‍टरमध्ये अशी ः
तालुका    काजू
सावंतवाडी    १११.६२
दोडामार्ग    १९.२६
वेंगुर्ले    ८४.८६
कुडाळ    १०९.६६
मालवण    २६३.०४
कणकवली    २२०.२२
देवगड    ११९.१०
वैभववाडी    ७३.१०

साहजिकच कोकणातील दर्जेदार काजूचा दर पडला. इतक्‍या कमी दराने कारखानदारांना काजू देणे परवडेनासे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक काजू व्यावसायीक अडचणीत आले आहेत. काहींनी आपल्याकडील कच्चा माल कमी किंमतीत विकून टाकला व यंदाच्या हंगामात कारखान्यांना टाळेच ठोकले आहे. त्यांना झालेले नुकसान काही लाखांच्या घरात आहे. 

आयात शुल्कामुळे निर्माण झालेला पेच केंद्रस्तरावरच सोडवला जाऊ शकतो. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे हा प्रश्‍न मांडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्हीही निवेदन पाठविले आहे. यातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
- प्रकाश राणे,
अध्यक्ष कृषी बाजार समिती सिंधुदुर्ग

आता नव्याने काजू हंगाम सुरू होणार आहे. या परिस्थितीचा सगळ्यात मोठा फटका कच्च्या काजूच्या खरेदीवर होण्याची भीती आहे. गेली दोन वर्षे १५० ते १७५ इतक्‍या सरासरीने मिळणारा दर १०० च्या घरात येण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. असे झाल्यास नव्याने काजू बागायती केलेल्यांमध्ये नैराश्‍य येणार आहे. 

आयात शुल्कात झालेली घट काजू व्यावसायिकांसाठी अडचणीची ठरली आहे. यामुळे क्रेडिट जास्त काळ द्यावे लागते. त्यामुळे आर्थिक गणिते जुळवणे कठीण बनले आहे. यातून मार्ग न निघाल्यास पुढच्या काजू हंगामात काजू बीचा दर घसरण्याची भीती आहे.
- सिद्धेश देसाई,
सिंधुदुर्ग कृषी प्रोड्यूसर कंपनी तळकट

सिंधुदुर्गाचा ब्रॅंड टिकवणे मोठे आव्हान 
गोवा आणि मुंबई अशी काजूची दोन मोठी मार्केट आहेत. परदेशातून आणलेल्या काजू बीची चव कोकणातील काजूच्या तुलनेत दर्जाहीन असते. गोव्यात दर्जाचा फारसा विचार केला जात नाही; मात्र मुंबई मार्केटमध्ये दर्जा पाहिला जातो. त्यामुळे कोकणातील काजूची मुंबईत मक्‍तेदारी आहे. अलीकडच्या काळात दर कमी झाल्याने कोकणातून गेलेल्या काही मालात परदेशी काजूची भेसळ झाली. यामुळे काही माल रिजेक्‍ट होऊन परत आला. काहींनी मात्र नुकसान सोसूनही दर्जा कायम ठेवला. असे असले तरी दराच्या या कसरतीत सिंधुदुर्गाचा काजू ब्रॅंड टिकवणे मोठे आव्हान ठरणार आहे.

 

Web Title: Sindhudurga cashew industry collapses