esakal | Sindhudurga : कुणी वीज देता का वीज?
sakal

बोलून बातमी शोधा

eletricity

Sindhudurga : कुणी वीज देता का वीज?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळणे : ऐन गणेशोत्सवात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने कळणे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भरमसाट वीज बिलांची वसुली करणाऱ्या महावितरणला ऐन गणेशोत्सवातदेखील वीजपुरवठा सुरळीत ठेवता आलेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला विजेचा खेळखंडोबा गणपतीच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली.

सासोली वीज उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या कळणे, आडाळी, मोरगाव सह कोलझर परिसरातील गावातील वीज वारंवार गायब होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु असताना विजेच्या या लपंडावाने ग्राहक हैराण झाले आहेत. ११ केव्ही क्षमतेच्या वाहिनीतील सततच्या बिघडामुळे वीजपुरवठा अनियमित आहे. त्यात कहर म्हणजे आज रात्रीही अनेक ठिकाणी वीज गायब झाली. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीमध्ये गावातील वायरमन अडकल्याने गावातील किरकोळ दुरुस्ती राखडल्याने ग्राहकांना मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. गणेशमूर्ती शाळा, दुकाने आदींमध्ये गैरसोय झाली.

सुरवातीला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित देखभाल दुरुस्ती असेल असा ग्राहकांचा समज होता; मात्र गणपतीच्या आदल्या रात्री देखील अनेकदा रात्रभर वीज खंडित झाली.

हेही वाचा: Sindhudurga : पालकमंत्री सामंत आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

अधिकारी, लोकप्रतिनिधी कुठे आहेत ?

तालुक्यातील बांदा-दोडामार्ग, दोडामार्ग-तिलारी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जनता संतप्त आहे. गणेशोत्सव काळातही खड्डेमय रस्त्यावरून मार्ग काढत जनता जीव मुठीत धरून प्रवास करतेय. त्यातच आता विजेच्या खेळखंडोब्याने जनता त्रस्त झाली. एरव्ही सण -उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेचे आढावे घेणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र या समस्येवर जनतेचे समाधान करू शकले नाहीत, अशी खंत व्यक्त होत आहे.

दोडामार्गातही खेळखंडोबा

दोडामार्ग तालुक्यात ऐन गणेशोत्सवात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. शासनाने गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा २४ तास सुरू ठेवावा, असा आदेश महावितरणला दिला आहे; मात्र प्रत्यक्षात उलट स्थिती आहे. गावागावांत विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. कधी दिवसभर, तर कधी रात्रभर वीज गायब होत असल्याने चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्थानिक आणि चाकरमानी आधीच हैराण झाले आहेत. त्यात दिवस दिवस वीज गायब होऊ लागल्याने सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. वीज नसल्यामुळे अनेक ठिकाणचे टॉवर बंद झाल्याने बीएसएनएलची सेवा बंद पडली आहे. दरम्यान, येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधक जिल्ह्याला लशी कोणाच्या माध्यमातून आल्या यावरून श्रेयाचे राजकारण करण्यात दंग आहेत. त्यापेक्षा सत्ताधारी खासदार, आमदार, पालकमंत्री आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ऐन गणेशोत्सवात गणेशभक्तांना सुरळीतपणे वीजपुरवठा कसा करता येईल, याकडे लक्ष द्यावे.

-सुभाष गवस, झोळंबे.

loading image
go to top