५०० हून अधिक अंगणवाड्यांना जागा नाही

५०० हून अधिक अंगणवाड्यांना जागा नाही

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही पाचशेहून अधिक अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. निधी उपलब्ध असूनही जागा मिळत नसल्याने इमारतीचे बांधकाम करता येत नाही. तरी जिल्ह्यातील खासगी जागेत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती बांधण्यासाठी अंगणवाडीसेविकांनी बक्षीसपत्राने जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी 
कमलाकर रणदिवे यांनी आजच्या महिला व बालविकास समिती सभेत केल्या.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सचिव कमलाकर रणदिवे, सदस्य माधुरी बांदेकर, वर्षा कुडाळकर, राजलक्ष्मी डिचवलकर, श्‍वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, संपदा देसाई, खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५५८ कार्यरत अंगणवाड्यांपैकी १६२ अंगणवाड्या खासगी जागेत भरत आहेत, तर ३०० हून अधिक अंगणवाड्या शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये कार्यरत आहेत. अशा पाचशेहून अधिक अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. निधी उपलब्ध असूनही जागेअभावी इमारती बांधकाम करता येत नसल्याची माहिती सभेत देण्यात आली तर सिंधुदुर्गातील सर्व अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतीसाठी सर्व अंगणवाडीसेविकांनी गावात फिरती करून अंगणवाडीसाठी योग्य जागेची निवड करून संबंधित जमीनमालकाकडून बक्षीसपत्राने जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना या वेळी रणदिवे यांनी केली.

महिला व बालविकास विभागामार्फत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेटी पुरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजनकडून ५० स्मार्ट अंगणवाड्यांसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर असून नवीन आर्थिक वर्षात आणखी ५० स्मार्ट अंगणवाड्यांची यादी तयार करून जिल्हा नियोजनकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली.

बालविकास विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले असून घरघंटी ९५, सायकल २३०, शिलाई मशीन ९५ लाभार्थ्यांना पुरविण्यात येणार आहेत. परिचारिका, टंकलेखन प्रशिक्षणासाठीही प्रस्ताव मागविले आहेत. गरजूंनी वेळीच प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना सभापती सायली सावंत यांनी केली.

ज्या अंगणवाड्यांकडे झुल्याचे वजनकाटे आहेत व ज्या अंगणवाड्यांमध्ये अद्यापही वजनकाटे उपलब्ध नाहीत अशा २७६ अंगणवाड्यांचे वजनकाटे पुरविण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

महिला व बालविकास विभाग जिल्ह्यात १५५८ अंगणवाड्या असल्याचे सांगतो, तर आरोग्य विभागाच्या माहितीमध्ये १५४३ अंगणवाड्या असल्याचे सांगतो. मागील आरोग्य समिती सभेत सभापती प्रितेश राऊळ यांनी अंगणवाड्यांच्या संख्येबाबत दोन विभागांमध्ये असलेली तफावत दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र आजच्या सभेतही दोन्ही विभागांकडून माहिती देतांना संख्येबाबत अद्यापही तफावत असल्याचे स्पष्ट झाले.

अंगणवाड्यांमध्ये कमी ऐकू येणाऱ्या व कमी दृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर (मुलांवर) विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार करून घेण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशा मुलांची यादी तयार करा, अशी सूचना रणदिवे यांनी महिला व बालविकास समिती सभेत दिली.

जिल्ह्यात १६४ तीव्र कुपोषित बालके
जिल्ह्यात अद्यापही १६४ तीव्र कुपोषित व १२१२ एवढी मुले कमी वजनाची असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. १६४ मुलांना बालसंगोपन व उपचार केंद्रामध्ये दाखल करून त्याचे वजन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com