जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड उद्या (ता. 21) होत असल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे; मात्र 21 व्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबत उत्सुकता वाढली आहे. 

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड उद्या (ता. 21) होत असल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे; मात्र 21 व्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबत उत्सुकता वाढली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरापासून नामनिर्देशन पत्र भरणे, अर्जाची छाननी, अर्ज मागे घेणे, दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित असल्याने या पदासाठी कॉंग्रेस पक्षातून निवडून आलेल्या इच्छुक सदस्यांची संख्या मोठी आहे, मात्र अनुभव आणि आतापर्यंत देण्यात आलेली संधी याचा विचार करता सावंतवाडी-माजगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या रेश्‍मा सावंत यांचे नाव आघाडीवर आहे तर याचबरोबर सर्वाधिक मताधिक्‍य घेणाऱ्या अनुभवी संजना सावंत यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद सभागृहात विरोधकांची संख्या मोठी असल्याने अनुभवी सदस्याला अध्यक्ष पदावर संधी मिळण्याची शक्‍यता आहे. उपाध्यक्ष पदासाठीही अनेकजण इच्छुक असून या पदासाठी रणजित देसाई, बाळा जठार, दादा कुबल, संजय आंग्रे यांची नावे आघाडीवर आहेत. तरी प्रत्यक्षात उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्याचा कार्यकाल 21 मार्चला समाप्त होत आहे. नवनिर्वाचित सदस्याचा कार्यकाल सुरू होत असल्याने उद्यापासून जिल्हा परिषद भवन गजबजू लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गेले महिनाभर जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट पसरला होता. विद्यमान सदस्यांचा कार्यकाल संपत आल्याने महिन्याभरात झालेल्या विषय समिती सभाही केवळ सोपस्कर म्हणून पार पडल्या, मात्र आता नवनिर्वाचित सदस्य सभागृहात नव्याने दाखल होणार असल्याने नवी उमेद व उत्साहाने सभांचे कामकाज सुरू होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठीही आतापासूनच सदस्यामध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदे आपल्या तालुक्‍याला मिळावीत, यासाठी प्रत्येक तालुक्‍यातून जोर लावला जात आहे; मात्र कॉंग्रेस नेते नारायण राणे हेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण, याचा निर्णय घेणार असल्याने होत असलेली चर्चाही केवळ चर्चाच राहणार आहे. 

Web Title: sindhudurgnagari zp election