दाखले मिळवायचेत; तयारीला लागा !

राजेश सरकारे
सोमवार, 30 एप्रिल 2018

दहावी-बारावी निकालानंतर प्रवेशप्रक्रियेस सुरुवात होते. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्‍यकता असते. दाखल्यांसाठीची कागदपत्रे मिळवताना पालक व विद्यार्थ्यांचीही दमछाक होते. अशातच सर्व्हर डाऊन समस्येचा फटकाही विद्यार्थ्यांना बसतो. त्याचे परिणाम आयुष्यभर सोसावे लागतात. ऐनवेळची धावपळ थांबवण्यासाठी प्रवेश व त्याअनुषंगाने दाखल्यांची तयारी आत्तापासून करणे आवश्‍यक ठरते.

पूर्वी ऑफलाईन पद्धतीने दाखले दिले जात. एका दाखल्यावर तहसीलदार ऑफिसचे रजिस्ट्रार, क्‍लार्क ते प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ क्‍लार्क, नायब तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मिळून दहा सह्या लागत. त्यासाठी दहा-दहा दिवस लागत. हा विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाली; मात्र ऑनलाईन सेवेत सातत्याने बिघाडामुळे दाखले मिळविण्यासाठी अद्यापही विलंब लागताना दिसतो.

या जोडीलाच एका कार्यालयाऐवजी आता महा ई-सेवा केंद्र आणि तहसीलदार कार्यालय असे दोन ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले ग्रामसेवक, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून तयार करून घेतले जातात. त्यानंतर तहसील किंवा प्रांताधिकाऱ्यांकडून ते वितरित होतात. सध्या ऑनलाईन सातबारा, फेरफार व इतर संगणकीय कामांत तलाठी, ग्रामसेवक असतात. शाळा- महाविद्यालये सुरू झाल्यानंतर महसूल यंत्रणेतील या घटकांवर ताण येतो. त्यामुळे कागदपत्रांसाठी पालक, विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाढतात.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने दूरसंचार सेवेच्या केबल तुटतात. त्यामुळे दाखले मिळताना अडचण येते. त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केल्यास दाखले मिळणे सोयीचे होईल.
- गणेश पारकर, 
महा ई-सेवा केंद्र चालक

शाळा-महाविद्यालय प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची धावपळ होते. त्यामुळे मानसिक ताण येतो. आवश्‍यक दाखले विद्यार्थ्यांना शाळेतच देण्याची व्यवस्था केल्यास प्रवेशावेळी विद्यार्थी, पालकांची होणारी धावपळ थांबेल.
- महेंद्र नाटेकर, शिक्षणप्रेमी

कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना फी माफीसाठी उत्पन्न दाखला आवश्‍यक ठरतो. त्यासाठीची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. मात्र अनेकदा नेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने उत्पन्न दाखला मध्येच अडकून पडतो. दरवर्षी ही समस्या उद्‌भवते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
- वैभव किंजवडेकर, विद्यार्थी

दरवर्षी विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी धावपळ होते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने प्रवेश प्रक्रियेआधीच शाळा-महाविद्यालयांत कॅम्प भरवून विविध प्रकारचे दाखले देण्याची पद्धत सुरू करावी. तसे झाल्यास विद्यार्थ्यांची धावपळ थांबून दिलासा मिळेल.
- डॉ. संभाजी शिंदे, प्राचार्य, 
कणकवली महाविद्यालय

हे करावे लागेल

 •  महाविद्यालयांतून कॅम्प भरवून दाखले द्यावेत
 •  ऑनलाईन सेवा सुरळीत करावी
 •  एकाच छताखाली दाखले देण्याची व्यवस्था व्हावी
 • डोंगरी दाखल्यासाठी

 दाखलाधारक १८ वर्षे पूर्ण आवश्‍यक

 •  वय अधिवास प्रमाणपत्र 
 •  शिधापत्रिका
 •  शाळा सोडल्याचा दाखला
 •  घरपत्रक उतारा
 •  रहिवासी दाखला (पोलिसपाटील, ग्रामसेवक, नगराध्यक्ष)
 •  लेजर पेपरवर प्रतिज्ञापत्र
 •  दाखलाधारकाचे छायाचित्र
 •  आधार कार्ड
   
Web Title: Sindudurg News collect certificates, Document