थेट भाजीपाला विक्रीला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कणकवली - येथे पंचायत समिती, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या गावठी बाजाराला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचा शेतमाल व इतर उत्पादने थेट उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडूनही समाधान व्यक्‍त झाले.

कणकवली - येथे पंचायत समिती, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या गावठी बाजाराला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचा शेतमाल व इतर उत्पादने थेट उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडूनही समाधान व्यक्‍त झाले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली उत्पादने, भाजीपाला, गावठी कोंबडी, अंडी, कंदमूळ व इतर साहित्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक शुक्रवारी पंचायत समितीच्या बांधकाम कार्यालयात गावठी बाजार भरवला जात आहे. 

या बाजाराला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. या बाजाराला विक्रेते व ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्‍त केले. पुढील कालावधीत या गावठी बाजाराची व्याप्ती वाढवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

कणकवलीत प्रजासत्ताक दिनी या गावठी आठवडा बाजाराचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर आजच्या बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांनीही मोठी गर्दी केली होती. आजच्या बाजरात कणकवली तालुक्‍याबरोबरच मालवण, कुडाळ, वैभववाडी येथील शेतकऱ्यांनी तसेच महिला बचतगटांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आणला होता. यामध्ये यामध्ये कोळोशी कुलस्वामिनी बचत गटाच्या स्मिता कुलकर्णी यांनी कुळीथ पीठ, डांगर पीठ, मेथी लाडू, कुलदैवत बचत गट जानवलीच्या माधवी मिठबावकर यांनी गावठी चिकन रस्सा व भाकरी ग्राहकांना विक्रीसाठी ठेवले होते.

हळवल येथील रंजिता मांजरेकर यांनी कणगी, पोहे, पालेभाजी, शेगुल शेंगा, उकडे तांदूळ, गावठी अंडी तर रामगड येथील उर्मिला मुणगेकर यांनी कोकम, आगूळ, चुरण, वांगी, मिरची रोप, उन्हाळी बी-बियाणे, साकेडीच्या राजश्री परब यांनी गावठी कोंबड्या तर पोईपचे बाबा वर्दम यांनी हिराची झाडू, कुळीथ, गावठी केळी, तांदूळ, नारळ अशा प्रकारचा  विविध शेतमाल विक्रीसाठी आणला होता.

Web Title: Sindudurg News Direct selling of vegetable in Kankavali