दोडामार्गात आरोग्य प्रश्‍नासाठी आक्रोश

दोडामार्गात आरोग्य प्रश्‍नासाठी आक्रोश

दोडामार्ग-  दर्जेदार आरोग्य सुविधांच्या मागणीसाठी अखेर तालुकावासीयांचा जनसागर तहसील कार्यालयावर धडकला. 
आरोग्याच्या प्रश्‍नासाठी उभारलेल्या आंदोलनाला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. स्वतः पदरमोड करून ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे आलेले स्त्री-पुरुषांचे जथ्थे शासनाला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडेल, असा एकोपा आणि दुर्दम्य इच्छाशक्‍ती जिल्हावासीयांनी अनुभवली.

गोवा शासनाने १ जानेवारीपासून परराज्यातील रुग्णांना रुग्णसेवेसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. गोवा सीमेवरील सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि त्याहीपेक्षा दोडामार्गला सर्वाधिक झळ पोचत आहे. त्यामुळे दोडामार्गमधील युवकांनी जनआक्रोश समिती स्थापन करून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ठिय्या आंदोलन हा त्यापैकीच एक टप्पा. गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात आणि म्हापशातील जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच विनाशुल्क सेवा मिळावी अथवा राज्य शासनाने जिल्ह्यातील रुग्णांचे शुल्क गोवा शासनाकडे वर्ग करावे, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, केएफडी संदर्भात तपासणी, निदान आणि संशोधन व उपचार केंद्र जिल्ह्यात सुरू व्हावे आणि झाराप ते दोडामार्ग दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन होत आहे. पालकमंत्री तथा वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी (ता. १८) समिती संयोजकांची भेट घेऊन दोन कोटी रुपये गोव्यातील उपचारासाठी मंजूर केल्याचे सांगितले; मात्र तसे पत्र महाराष्ट्र व गोवा शासनाकडून यायला हवेत, असे सांगून पंधरा दिवस थांबणार नाहीत; तर दोन कोटी गोव्याला दिल्याचे आणि गोव्याने रुग्णांना निःशुल्क सेवा देण्याचे मान्य केल्याचे पत्र द्या; अन्यथा ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त केला. श्री. केसरकर यांच्याकडून ठोस ग्वाही न मिळाल्याने आज नियोजित ठिय्या आंदोलन झाले. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील महिला, पुरुष मंडळी वेगवेगळ्या वाहनांनी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गोळा झाली. हजारो तालुकावासीय एकत्र झाल्यावर तेथून तहसील कार्यालयापर्यंत मोठी रॅलीच निघाली. महिलांचा सहभाग विलक्षण होता. हजारोंच्या संख्येने तहसीलकडे निघालेल्या तालुकावासीयांमुळे सिद्धिविनायक मंदिरापासून तहसीलपर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता.
तहसीलसमोरील मंडपही अपुरा पडला. पुरुष मंडळी मंडपाबाहेर जथ्थ्याजथ्थ्याने उभी होती. त्यांना समितीच्या संयोजकांसह पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडीहून आलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, राजू मसूरकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणकर यांनी मार्गदर्शन केले. ठिय्यासाठी ग्रामीण भागातून कित्येक किलोमीटरचे अंतर तोडून पदरमोड करून आलेल्या अनेकांनी आपल्या भावना मांडल्या. गोवा आणि सिंधुदुर्गचे रोटीबेटीचे व्यवहार वर्षानुवर्षाचे आहेत. ते ऋणानुबंध कायम राहायला हवेत. गोव्याला आम्ही वीज देतो, पाणी देतो, बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी आम्ही देतो. जवळपास २७ हजार जिल्ह्यातील कामगार गोव्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी श्रम करतात. असे असताना गोवा शासन आम्हाला शुल्क आकारते हे अन्याय आहे. तो दूर झाल्याखेरीज आंदोलन थांबता नये. एवढे करूनही आमच्या बाजूने निर्णय होत नसेल तर गोव्याचे पाणी आणि वाळू, खडू बंद करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल, अशा अनेक मुद्द्यावर यावेळी विचारमंथन आणि मार्गदर्शन झाले. 
विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरपंचायत आणि पंचायत समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

आज पुन्हा ठिप्या
तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी दुपारी आंदोलकांशी चर्चा केली. पण समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच आहे. महिलांना घरी पाठविले, तर पुरुष मंडळी आंदोलन पुढे सुरू ठेवणार आहेत. महिला उद्या पुन्हा या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com