सावधान ! दोडामार्गात सहाजण तर  शिरोड्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

तालुक्‍यातील कसई गावठणमध्ये 2, दोडामार्ग धाटवाडीमध्ये 1, आंबेली माणगावकरवाडीमध्ये 1, पिकुळे मधलीवाडीमध्ये 1 तर घाटीवडे येथे 1 असे सहा रुग्ण आढळले. तालुका आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर यांनी ही माहिती दिली. 

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात आज सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत तालुक्‍यात 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील अकरा जण बरे होवून घरी परतले आहेत तर 11 जण सक्रिय आहेत. त्यातील चार रुग्ण कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील आहेत. 

तालुक्‍यातील कसई गावठणमध्ये 2, दोडामार्ग धाटवाडीमध्ये 1, आंबेली माणगावकरवाडीमध्ये 1, पिकुळे मधलीवाडीमध्ये 1 तर घाटीवडे येथे 1 असे सहा रुग्ण आढळले. तालुका आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर यांनी ही माहिती दिली. 

गेल्या काही दिवसात तालुक्‍यातील अनेक भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. गेल्या चोवीस तासात कुडासे वानोशी, उसप केळीचे टेंब, तळकट कट्टा, कोनाळ, सासोली बाजारवाडी आणि शिरवल बाग येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज कसई गावठण, दोडामार्ग धाटवाडी, पिकुळे, घाटीवडे आंबेली येथे रुग्ण आढळले आहेत. 

चोरवाटांचा प्रवास धोकादायक 
गणेशोत्सवासाठी पुण्या मुंबईसह गोव्यातील अनेकजण तालुक्‍यात येत असल्याने रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. कदाचित आणखी काही दिवसांत त्यात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. गोव्यातून अनेकजण चोरवाटांनी प्रवेश करत आहेत. राज्य शासनाने त्यांना आरटी पीसीआर आणि अन्य एका चाचण्याचे अहवाल सक्तीचे केले आहेत. अँटीजेन चाचणीवर त्यांना प्रवेश दिला जात नाही आणि अन्य दोन चाचण्या सहजासहजी करुन मिळत नाहीत. त्यामुळे अनेकजण कुठलीही चाचणी न करता तालुक्‍यात येत आहेत. गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड असल्याने तालुक्‍यासाठी धोक्‍याची शक्‍यताही मोठी आहे. 
 

शिरोडा परबवाडीत कोरोना पॉझिटिव्ह 
शिरोडा - ऐन गणेश चतुर्थी दिवशीच शिरोडा परबवाडीतील एका अठ्‌ठावीस वर्षीय युवकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भिती व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान परबवाडीतील तो भाग कंटेनमेंट झोन केला आहे. 

शिरोड्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता बारा झाली आहे. हा युवक गोव्यातून शिरोड्यात आल्यानंतर चौदा-पंधरा दिवस क्‍वारंटाईन होता. त्यानंतर दोन दिवसांनी कामासाठी बाहेरगावी गेला. त्यावेळी पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्क आला. त्यानंतर प्रकृतीत संशय वाटल्याने त्याने वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Corona Patient In Dodamarg And One In Shiroda