सिंधुदुर्गात सहाशेवर डॉक्‍टरांचा संप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सावंतवाडी - डॉक्‍टरांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेध करण्यासाठी तसेच तपासणीच्या नावावर सुरू असलेल्या जाचाला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांना डॉक्‍टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी यात लक्ष घालण्याची ग्वाही दिली.

सावंतवाडी - डॉक्‍टरांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेध करण्यासाठी तसेच तपासणीच्या नावावर सुरू असलेल्या जाचाला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील डॉक्‍टरांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांना डॉक्‍टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी यात लक्ष घालण्याची ग्वाही दिली.

आंदोलनात जिल्ह्यातील सहाशेहून अधिक डॉक्‍टर सहभागी झाले होते. सर्व तालुक्‍यात हे आंदोलन यशस्वी करण्यात आले, असे डॉक्‍टरांच्या संघटनेकडून सांगण्यात आले. याबाबत डॉक्‍टरांच्या संघटनेकडून श्री. केसरकर यांना निवेदन देण्यात आले. यात राज्यात सातत्याने डॉक्‍टरांवर हल्ले होत आहेत, अशा सततच्या हल्ल्यामुळे सिंधुदुर्गसारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या विषयाबाबत विधी मंडळाचे लक्ष वेधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. 

दरम्यान, या वेळी प्रांताधिकारी कार्यालय ते पालकमंत्री निवासस्थान असा या वेळी मोर्चा काढण्यात आला. या वेळी डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्यांचा निषेध असो...अशा घोषणा देण्यात आल्या. सर्व डॉक्‍टर काळ्या रंगाचा पेहराव करून या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी केसरकर यांनी उपस्थितांशी चर्चा केली. डॉ. राजेश नवांगुळ म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या डॉक्‍टरांना चुकीच्या पद्धतीने मारहाण केली जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी योग्य तो निर्णय शासनस्तरावर घेणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी डॉक्‍टर रुग्ण दगावल्याबाबत माहिती देतात, त्यावेळी त्यांना सुरक्षा देण्यात यावी. तसेच नियमित सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे.’’ 

डॉ. शंतनू तेंडुलकर म्हणाले, ‘‘अन्य जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्गातील डॉक्‍टरांकडून चुकीची कामे केली जात नाहीत, असे असतानाही प्रशासनाकडून तपासणीच्या नावावर नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, हा प्रकार चुकीचा आहे आणी तो बदलणे गरजेचे आहे.’’ 

या वेळी तालुका संघटनेचे डॉ. नवांगुळ, डॉ. तेंडोलकर, मिलिंद खानोलकर, अजय स्वार, अरविंद खानोलकर, दत्ता सावंत, अमोल पावसकर, संजय सावंत, राजशेखर कार्लेकर, प्रशांत बाड, सुबोध कशाळीकर, सतिश सावंत, विद्यानंद सावंत, अश्‍वीनी खानोलकर, श्रद्धा कासार, श्रेयस मांगलेकर, राघवेंद्र तळेगावकर, धीरज सावंत, अमेय पांण्डे, रेवण खटावकर, सतीश सावंत, कश्‍यप देशपांडे, मीना जोशी, शंकर सावंत, शर्वरी सावंत, संजना देसकर, यशवंत सावंत, अभिजित वझे, विशाल पाटील, गौरी तानावडे, सूरज देसकर आदी डॉक्‍टर सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील डॉक्‍टर प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. शासनाने जरूर कायदा राबवावा; परंतु त्या कायद्याचा सर्वसामान्य आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना त्रास होणार नाही, यासाठी शासनस्तरावरच प्रयत्न व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. डॉक्‍टरांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे वेगळ्या तऱ्हेचे संरक्षण देण्याची गरज नाही. डॉक्‍टरांनी आपले आंदोलन शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ 
- दीपक केसरकर, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

Web Title: Six hundred doctors on strike