कूपनलिकेत पडलेल्या कावेरीसाठीची "झुंज' व्यर्थ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

चिक्कोडी - झुंजरवाड (ता. अथणी) येथील कूपनलिकेत पडलेल्या सहा वर्षीय बालिका कावेरी मादर हिचा मृतदेहच 56 तासांनंतर हाती लागला. सोमवारी मध्यरात्री 11.40 वाजता तिचा मृतदेह बचावकार्य पथकाला मिळून आला. त्यामुळे तिच्या मदतीसाठी हजारो हातांकडून सुरू असलेली झुंज व्यर्थ ठरली. 

चिक्कोडी - झुंजरवाड (ता. अथणी) येथील कूपनलिकेत पडलेल्या सहा वर्षीय बालिका कावेरी मादर हिचा मृतदेहच 56 तासांनंतर हाती लागला. सोमवारी मध्यरात्री 11.40 वाजता तिचा मृतदेह बचावकार्य पथकाला मिळून आला. त्यामुळे तिच्या मदतीसाठी हजारो हातांकडून सुरू असलेली झुंज व्यर्थ ठरली. 

रविवारी सायंकाळपर्यंत तिची हालचाल सीसी कॅमेऱ्यातून दिसत होती; पण त्यानंतर तिची हालचाल मंदावल्याने ऑक्‍सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी आईसोबत सरपण वेचण्यास गेली असता ती निरुपयोगी कूपनलिकेत पडून 30 फुटांवर अडकली होती. तिच्या बचावासाठी विविध ठिकाणांहून "एनडीआरएफ' पथकांना पाचारण करण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी कूपनलिकेला समांतर खड्डा खोदण्यात आला होता. त्यासाठी पाच यंत्रे वापरण्यात आली. जिल्हा प्रशासन तिच्या बचावकार्यासाठी कार्यरत झाले होते. 

सोमवारी रात्री कावेरीचा मृतदेह हाती लागताच वडील अजित व आई सविता यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अथणी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपनलिका निरुपयोगी असतानाही ती बुजविली नसल्याने शेतमालक शंकर हिप्परगी यांच्यावर ऐगळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर 
खडकाळ जमीन असल्याने समांतर खड्डा खोदण्याच्या कामात विलंब झाला; पण जिल्हा प्रशासनाने याकामी सर्व त्या योजना राबविल्या. अखेर सोमवारी रात्री 11.40 वाजता पथकाने तिचा मृतदेह बाहेर काढला. ती जिवंत असण्याची शक्‍यता वर्तविली जात असतानाच मृतदेह पाहून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

पाळलेल्या कुत्र्याचाही सहभाग 
सोमवारी रात्री एक वाजता घराशेजारीच दफनविधी करण्यात आला. मंगळवारी सकाळी पाणी ठेवण्याचा कार्यक्रम झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिला दुधाचा नैवेद्य अर्पण केला. या वेळी तिने पाळलेल्या पिंटू या कुत्र्यानेही सहभाग घेतला. तिला दफन केलेल्या जागेभोवती कुत्रा फेऱ्या मारत होते. 

मदतनिधीसाठी प्रयत्न 
आमदार लक्ष्मण सवदी यांनी मादर कुटुंबीयांना वैयक्तिक व सरकारकडून मदतनिधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मुख्यमंत्र्यांना खास पत्र लिहून कावेरीच्या कुटुंबीयांना मदत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Six-year-old girl Kaveri Maader