अल्लड निर्णयाने कुटुंब उद्‌ध्वस्त

अल्लड निर्णयाने कुटुंब उद्‌ध्वस्त

दोडामार्ग - अनवधानाने अथवा अल्लडपणाने एखाद्याने केलेल्या छोट्याशा चुकीमुळे अख्ख्या कुटुंबाची कशी वाताहात होते, याची प्रचीती साटेली भेडशीतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाने आली.  गोष्ट अगदी सहज सुरू झालेली. भिन्नलिंगी आकर्षण तरुण वयात अथवा पौंगडावस्थेत असणं ही एक मानसिक अवस्था असते. साटेली भेडशीतून मध्य प्रदेशमध्ये पळून गेलेले युवक-युवतीही त्याच अवस्थेतून गेले असतील; पण त्याचे परिणाम इतके भयंकर असतील असे तेव्हा दोघांनाही वाटले नसेल. काबाडकष्ट करून मुलाबाळांना पोसणारं कुटुंब मुलीच्या अचानक पवित्र्याने हबकून गेलं. आई-वडिलांच्या मनातील सुरवातीची रागाची जागा नंतर काळजीने घेतली. मुलीला परत आणावे यासाठी आईने पोलिसांकडे आर्जव केले. जसजसे दिवस जायचे तशी तिची अस्वस्थता वाढे आणि अखेर तिने घटनेने दिलेला सनदशीर आंदोलनाचा मार्ग निवडला. नातेवाईक, समाजबांधव, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते त्या कुटुंबाशी जोडले गेले.

पोलिसांवर दबाव आला,  तपासाची चक्रे फिरली. ती मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या मुलाचा पत्ता सापडला. आई वडिलांना हायसे वाटले. पोलिसांनी वडिलांना मध्यप्रदेशमध्ये सोबत नेले. तेथेच त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा मृत्यू झाला. हतबल कुटुंबावर एक नवा आघात झाला. पोलिसांनी मग मृतदेह आणण्यासाठी मुलीच्या आईला नेले. एकीकडे मुलीमुळे समाजात झालेली बेअब्रू तर दुसरीकडे नवऱ्याचे दुःख. काळजावर दगड ठेऊन तिने धीराने अडीच हजार किलोमीटरचा प्रवास विश्रांतीविना केला. सोबत पतीचे पार्थिव आणि मनात असंख्य प्रश्‍नांचे प्रचंड काहूर घेऊन ती परतली; पण भावाचा मृत्यू संशयास्पद असल्याने दिराने पुन्हा शवविच्छेदनाचा आग्रह धरला. दीर आणि नातेवाईकांना तिने समर्थन दिले. त्यासाठी पोलिस आणि त्यांच्यात संघर्षही झाला. बुधवारची अख्खी रात्र ते सगळे रूग्णालयात तर मृतदेह शववाहिकेत राहिला. त्यानंतर पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय झाला. मृतदेह दोडामार्गवरुन ओरोसला नेलाय, तिथून तो कोल्हापूर, मिरज किंवा गोव्याला नेला जाईल. इथली प्रक्रिया लवकर झाली तर तो आज ताब्यात मिळेल, नाहीतर उद्या. मृतदेहाची परवड चार पाच दिवस सुरु आहे. अख्ख कुटुंब, नातेवाईक, पै पाहुणे सगळे अस्वस्थ आहेत. ज्यांच्यामुळे ही परिस्थिती ओढवली त्या मुलीला निवारा केंद्रात ठेवले आहे. युवकावर गुन्हा दाखल झाल्याने तो पोलिस कोठडीत आहे. त्याचे आईवडील आणि कुटुंबालाही अनेक त्रासातून जावे लागले असेल. दोन्ही कुटुंबे दोघांच्या आततायी निर्णयामुळे दुःख भोगत आहेत.

प्रेमात हवा परिणामांचा विचार
प्रेम ही स्वर्गीय आणि नितांतसुंदर भावना आहे; पण त्यात समज हवी. परिणामांचा विचार हवा. परिपक्वता हवी; अन्यथा एक चुकीचे पाऊल अनेकांची आयुष्ये एका क्षणात उद्‌ध्वस्त करू शकतात. असे निर्णय युवकांनी विवेकबुद्धी जागी ठेऊन घ्यावे. मग पश्‍चाताप आणि दुःखाची वेळ टाळता येऊ शकेल, अशी भावना येथे व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com