सिंधुदुर्ग : सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा जयघोष 

Sonurli Devi Mauli Yatra In Sindhudurg
Sonurli Devi Mauli Yatra In Sindhudurg

सावंतवाडी - नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी श्रध्दा असलेल्या सोनुर्ली येथील प्रसिध्द श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला आज भाविकांची मोठी गर्दी उसळली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. भक्‍तीमय वातावरणात प्रत्येकांच्या मुखातुन माऊलीचा जयघोष होता. मंदिर परिसरात उभारलेली विविध प्रकारची दुकाने व लोकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. 

लोटांगणाची जत्रा व प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक उत्सवाला यंदाही भाविकांची मांदीयाळी होती. पहाटे पुरोहितांकडून देवीची विधीवत पुजा केल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन खुले करण्यात आले. तत्पुर्वी रात्री देवीची पालखी मंदिराभोवती फिरवून दीपमाळा प्रज्वलित करून जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. 

भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड

सकाळी सात वाजता देवीचे दर्शन खुले करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. चेंगराचेंगरी व गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान समितीचे स्वयंसेवक आणि पोलिस एक एक करून भाविकांना आत सोडत होते. सळाळी आठपर्यंत मंदिर परिसरात लांबच लांग रांग लागली होती. मंदिराच्या डाव्या बाजूला दरवर्षी प्रमाणे दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. माऊली कला क्रीडा मंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून होते. 

सकाळपासूनच मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची झालेली वर्दळ लक्षात घेता वाहतूक पोलिसांसाठी चार चाकी वाहने मंदिरापासून लांबवरच अडविली. भाविकांना मंदिरापर्यंत दोन किलोमीटर चालत जावे लागत असल्याने नाराजी व्यक्‍त होत होती. दुपारनंतर झालेली गर्दी रात्री उशिरापर्यत कायम होती. गतवर्षी पेक्षा यावर्षीही जत्रोत्सवात महागाईचे सावट दिसून आले. 

आकर्षक मूर्ती 
वार्षिक उत्सवानिमित्त देवी माऊलीची मूर्ती सजविण्यात आली होती. सोन्या- चांदीच्या दागिन्यात मढविलेली मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. देवीच्या दर्शनाने प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर एकप्रकारे वेगळाचा आनंद दिसून येत होता. 

लोटांगण कार्यक्रम 
रात्री साडेअकरा वाजता उपवासकरी भाविकांचा लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. भाविकांना माऊलीच्या अवसकारी संचारांनी दर्शन दिले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com