एस. टी. कर्मचारी कर्जबाजारी

संपातील सहभागामुळे हाल; वेतनाअभावी हप्ते थकले, प्रत्‍येकी एक ते दीड लाखाचे नुकसान
ST  Employee are in Debt due to strike Kankavali
ST Employee are in Debt due to strike Kankavaliesakal

कणकवली : विलिनीकरणाच्या मुद्यावर एस. टी. कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांपासून संप सुरू आहे. या संपात सहभाग घेतलेले बरेचसे कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. पाच महिन्यांचे वेतन नसल्‍याने कर्मचाऱ्यांना सरासरी एक ते दीड लाखाचे नुकसान सोसावे लागले. याखेरीज वर्षभरातील २४० दिवसांची हजेरी पूर्ण होत नसल्‍याने त्‍यांना यंदाची ग्रॅच्युएटी मिळण्याचीही शक्‍यता दुरावली आहे. या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्‍यातही पाच महिन्यांचे जमा होणार नसल्‍याने कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागणार आहे.

नोव्हेंबर २०२१ पासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. यात सिंधुदुर्गातील दोन हजार १४६ पैकी तब्‍बल १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते; मात्र चालक आणि वाहक वगळता पहिल्‍या टप्पात बहुतांशी प्रशासकीय वर्गातील कर्मचारी कामावर रुजू झाले. एक हजार ३५० कर्मचारी गेल्‍या पाच महिन्यापासून संपात सहभागी आहेत. मागील चार दिवसापर्यंत १३३ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. उर्वरीत कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची शक्‍यता आहे.

मागील दहा वर्षांत पगारवाढ नसल्‍याने तसेच कोरोना कालावधीत विलंबाने वेतन होत असल्‍याने कंटाळलेल्‍या कर्मचाऱ्यांनी सर्व कामगार संघटनांना बाजूला करून संपात सहभाग घेतला होता. यात विलीनीकरणाची मागणी राज्‍य शासनाने फेटाळली. तर न्यायालयानेही कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचे निर्देश दिले. २२ पर्यंत रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रीतसर कारवाई करण्याचेही निर्देश एस. टी. महामंडळाला दिले. या सर्व प्रक्रियेत एस. टी. कामगारांच्या वेतनामध्ये वाढ झाली असली तरी गेल्‍या पाच महिन्यातील पगार थांबल्‍याने कर्मचाऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना डिसेंबरपासून नवी पगारवाढ लागू झाली. यात दहा वर्षांपर्यंत सेवा केलेल्‍या कर्मचाऱ्यांना १८ हजार, १५ वर्षे सेवा झालेल्‍यांना २० ते २५ हजार, २५ वर्षे सेवा झालेल्‍यांना ३० हजार पर्यंत वेतन मिळाले; मात्र संपात सहभागी कर्मचाऱ्यांना कोणतेही वेतन नसल्‍याने मागील पाच महिन्यांत संपकरी कर्मचाऱ्यांना एक ते दीड लाखापर्यंतच्या वेतनाला मुकावे लागले आहे.

याखेरीज सर्वच संपकरी कर्मचाऱ्यांचे मागील पाच वर्षांचे कर्ज हप्तही थकीत राहिले आहेत. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना एस. टी. बँक तसेच इतर बँकांकडूनही कर्ज मिळाले नाही. त्‍यामुळे मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून कर्ज घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपला लढा सुरू ठेवला होता.

एस. टी.चे राज्‍य शासनात विलिनीकरण होईल, या अपेक्षेने संपात सहभाग घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मी पुन्हा सेवेत रुजू झालो. एस.टी.त २८ वर्षे सेवा झाल्‍याने महिन्याला ३३ हजार रुपये वेतन आहे. मात्र, मागील पाच महिन्यात दीड लाखाचे नुकसान झाले. आता सेवेत रुजू झाल्‍याने बँकेकडून कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

- एक संपकरी कर्मचारी

मान्यताप्राप्त संघटना मागील २५ वर्षांत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू न शकल्याने एस. टी. कामगारांना संपात उतरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्‍यामुळे आता शासनानेही सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन देण्यासाठी कटिबद्धता ठेवली पाहिजे. आम्‍हीही यापुढे एस. टी. कर्मचाऱ्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, वेळोवेळी भत्ते आणि वेतनवाढ मिळत राहावी यासाठी लढा सुरू ठेवणार आहोत.

- मुकेश तिगोटे, सचिव, इंटक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com