ब्रेकिंग- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या...

विनोद दळवी
Thursday, 30 July 2020

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्हा स्तरीय बदली प्रक्रिया पार पडली.

ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्य शासनाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्हा स्तरीय बदली प्रक्रिया २८ जुलै रोजी पार पडली. यावेळी प्रशासकीय २३ आणि विनंती ५४ अशा एकूण ७७ अधिकारी-कर्मचारी बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या उपस्थितीत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया झाली.

 जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग वगळता अन्य विभागातील  १२२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी २८ रोजी शासनाच्या नियमानुसार समुपदेशन पद्धतीने करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडुन नियोजन करण्यात आले होते. यात २७ प्रशासकीय तर ९५ विनंती बदलींचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मे महिन्यात थाबलेल्या कर्मचारी बदल्या १५ टक्केच्या मर्यादेत ३१ जुलै पर्यंत करण्याचे आदेश शासनाने १५ दिवसापूर्वी दिले होते. त्यानंतर याला १० ऑगस्ट पर्यंत करण्यास मुदतवाढ दिली आहे. या १५ टक्के मध्ये प्रशासकीय ७.५ आणि विनंती ७.५ टक्के बदल्या अपेक्षित होत्या.

हेही वाचा- अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रिया सुरु मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनिश्‍चितता ..सविस्तर वाचा... -

एका जागेवर दहा वर्षे झालेल्यांची प्रशासकीय तर एका जागेवर चार वर्षे झालेल्यांची विनंती बदली होते. टक्केवारी नुसार ५९ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या अपेक्षित होत्या. मात्र यातील ३५ कर्मचारी हे १० वर्ष एकाच जागी सेवा केल्याचा निकष पूर्ण करीत नसल्याने त्यांना बदलीतून सूट देण्यात आली आहे.  त्यामुळे २७ कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीला सामोरे जावे लागले. तर  ९५ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या होणार होत्या.

दरम्यान गट क संवर्गातील १९१, वाहन चालक २ आणि गट ड संवर्गातील परीचर २१ असे एकूण २१४ विनंती बदली अर्ज प्राप्त झाले होते.  २७ प्रशासकीय बदल्या नियमात होणे अपेक्षित असताना २३ बदल्या झाल्या आहेत. यात सहाय्यक प्रशासन अधिकारी एक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दोन, वरिष्ठ सहाय्यक तीन, कनिष्ठ सहाय्यक ९, पशुधन पर्यवेक्षक एक, मुख्य सेविका तीन, विस्तार अधिकारी एक, जलसंधारण अधिकारी एक, बांधकाम अभियंता दोन अशाप्रकारे बदल्या झाल्या आहेत.

हेही वाचा- कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक होण्याची शक्यता.... -

विनंती बदलीमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी एक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दोन, वरिष्ठ सहाय्यक तीन, कनिष्ठ सहाय्यक आठ,  परिचर सात, शिक्षण विस्तार अधिकारी तीन, केंद्र प्रमुख दोन, औषध निर्माता एक, महिला आरोग्य सहाय्यक एक, पुरुष आरोग्य सेवक चार, महिला आरोग्य सेवक सहा, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एक, पशुधन पर्यवेक्षक एक, मुख्य सेविका दोन, ग्राम विकास अधिकारी दोन, ग्राम सेवक सात, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता एक, कृषि विस्तार अधिकारी एक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक अशाप्रकारे ५४ विनंती बदल्या करण्यात आल्या. 

हेही वाचा- रत्नागिरीमध्ये  2 पोलिस, एका नर्ससह 21 जण  कोरोना बाधित.... -

४१ विनंती बदल्या नाकारल्या:-पराडकर

  बदली प्रक्रिये बाबात सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना विचारले असता साडे सात टक्केच्या निकशानुसार जिल्हास्तरीय बदलीत ५९ अधिकारी-कर्मचारी यांच्या बदल्या होणार होत्या. पण यातील ३५ जणांना एका जागेवर दहा वर्षे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे २७ बदल्या अपेक्षित होत्या. त्यातील २३ बदल्या झाल्या. विनंतीसाठी ९५ बदल्या अपेक्षित होत्या. पण आम्ही ४१ बदल्या नाकारता ५४ बदल्या केल्या, असे सांगितले. कोरोना प्रभाव असल्याने बसलेली घडी विस्कटू नये, यासाठी विनंती बदल्या नाकारल्याचे ते म्हणाले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government order sindhudurg district level transfer process completed in Sindhudurg Zilla Parishad on 28th July