esakal | खांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

खांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’

खांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : सुकलेल्या लहान काठीसारखा दिसणारा आणि विशिष्ट हालचालीमुळे ओळखला जाणारा ‘स्टिक इन्सेक्ट’ हा कीटक खांबाळे येथे आढळला आहे. जेसीबी किंवा एखाद्या पोकलॅनप्रमाणे या कीटकाची हालचाल असते. पर्यावरणप्रेमींच्या मते, या कीटकाला पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर देखील कीटकाच्या अंड्यांना धक्का लागत नाही. त्या अंड्यातून या कीटकाचा प्रसार होतो.

पशु, पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे, शेकडो प्रकारचे कीटक आजूबाजूला पाहायला मिळतात. सिंधुदुर्गात तर अशा विविधतेचा खजिनाच आहे; परंतु त्यातही अनेक पक्षी, फुलपाखरे सहज लक्ष वेधून घेतात. अशाच प्रकारचा जिल्ह्यात सर्वत्र आढळणारा ‘स्टिक इन्सेक्ट’ हा आज खांबाळे येथील एका घराजवळ आढळला. सुरूवातीला वाळलेली काठी म्हणुन त्याकडे पाहण्यात आले; परंतु त्यानंतर त्याची हालचाल झाल्यामुळे तो कीटक असल्याचे स्पष्ट झाले. या कीटकाचा रंग काळसर आहे. जेसीबीप्रमाणे याची हालचाल होते. मागचे पाय काटकोनात तो उचलतो.

कधी कधी पुढचे टोक जेसीबीप्रमाणे जमिनीला टेकवून मागचे दोन्ही पाय उचलतो. हा खूप अंतर चालत नाही; परंतु चालताना त्याच्याकडे कुतूहलाने लोक पाहतात. हवेत तरंगल्याप्रमाणे तो चालत असल्याचा भास होतो. शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा कीटक करवंदीच्या वाळलेल्या काठ्या, गवताच्या सुकलेल्या काड्या किंवा अन्य झाडांच्या सुकलेल्या फांद्यांशी रंगरूप जुळवून घेतो. या कीटकाची अंडी टणक असतात. पर्यावरणप्रेमींच्या मते, एखाद्या पक्ष्याने याला खाल्ल्यानंतर त्याची अंडी पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. त्यातून देखील त्या कीटकाचा प्रसार होतो. तशाप्रकारचे निष्कर्ष संशोधनातून स्पष्ट झाले आहेत. तपकिरी कानाचा ‘बुलबुल’ पक्षी हे स्टिक कीटक खाण्यात निष्णात मानला जातो.

हेही वाचा: शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक

पाने, वेली हे ‘स्टिक इन्सेक्ट’चे खाद्य

प्रा. हेदुळकर म्हणाले, की ‘स्टिक इन्सेक्ट’ कीटकाची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असू शकते. स्वसंरक्षणासाठी हे कीटक निसर्गामध्ये त्याच्या परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या ठिकाणी जुळवून घेतात. याला एकूण सहा पाय असतात. पुढचे दोन पाय हे विश्रांतीवेळी ॲन्टीनाप्रमाणे समांतर ताणलेले दिसतात. वेगवेगळ्या वनस्पतींची पाने व वेली त्यांचे अन्न आहे. आपल्याकडे आढळणारा ‘भगत’, ‘प्रार्थना’ किडा हा या कीटकाच्या अगदी जवळचा आहे.

पर्यावरणप्रेमी म्हणतात...

  • जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा कीटक

  • वाळलेल्या फांद्यावर अधिकतर दिसतो

  • स्वसंरक्षणासाठी आपले रंगरूप फांद्यांशी जुळवतो

  • अंड्यातून कीटकाचा होतो प्रसार

  • कीटकांची अंडी असतात टणक

हेही वाचा: ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार

"एखाद्या लाकडाच्या काडीसारखा हा कीटक दिसत असल्याने त्याला ‘स्टिक इन्सेक्ट’ किंवा ‘ओकिंग स्टिक’, असे म्हटले जाते. हा फेझमीटीडी नावाच्या कुळामध्ये येतो. या कुळामध्ये जगभरात सुमारे तीन हजार प्रजाती आहेत."

- प्रा. नंदू रामकृष्ण हेदुळकर, प्राणिशास्त्र विभागप्रमुख, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी

loading image