esakal | शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक

शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : कौलारू छत असलेली छोटीशी खोली, एखादे टेबल आणि भिंतीवर टांगलेला फळा. छोटी मुले आणि उपलब्ध असलेल्या तोडक्या-मोडक्या शैक्षणिक साहित्याचा आधार घेऊन शिक्षण देणाऱ्या अंगणवाडी सेविका, असे अंगणवाडीचे स्वरूप गावागावात पाहायला मिळायचे. बालवयात शिक्षणाची गोडी लावून, बालमनाला आकार देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या अंगणवाड्यांचे रूपडे सध्या पालटत आहे.

काळानुरूप शैक्षणिक पद्धतीत बदल करत अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होऊ लागल्या आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयातच शिक्षणाशी घट्ट दोस्ती करण्यासाठी अंगणवाडी हे बाल शिक्षणाचे पहिले प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वारच काळाशी सुसंगत करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे प्रायोगिक तत्त्वावर रूप पालटले आहे. या अंगणवाड्या अधिक हायटेक बनविल्या आहेत. बालवयातील शिक्षण मुलांवर चांगले संस्कार करणारे समजले जाते. मुळाक्षरांची ओळख होत असतानाच गाणी, गोष्टी, गप्पा असे विविध उपक्रम खेळाच्या स्वरूपात अंगणवाडी सेविका शिकवतात.

हेही वाचा: यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

सध्या काळानुरूप शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहेत. बहुतांश शाळा डिजिटल झाल्या असतानाच आता अंगणवाड्याही स्मार्ट होत आहेत. अंगणातील खेळांपासून ते डिजिटल विश्वातील कार्टुन्सपर्यंतचे आनंददायी शिक्षण देण्यासाठी येथे बौद्धिक, तांत्रिक व पायाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत. तसेच कृतिशील शिक्षणावर भर देत मुलांचा सर्वांगीण विकास होतानाच शालेय शिक्षणाची गोडीही वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांना विविध उपकरणांचे स्मार्ट अंगणवाडी संच दिले आहेत. ज्यांच्या इमारती स्वतंत्र व सुस्थितीत आहेत, उपस्थिती चांगली आहे, अशा अंगणवाड्या निवडण्यात आल्या आहेत. या संचमध्ये सोलर लाईटिंग सिस्टीम, शैक्षणिक पोस्टर, ई-लर्निंग सॉफ्टवेअर (३२ इंच टीव्ही, प्री लोडेड पेन ड्राईव्ह), डेस्क फ्लोअर सिस्टीम, ऑफलाईन वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसिन यासोबत लिक्विड सोप, साबण, वॉटर बॉटल, हातरुमाल, कंगवा, नेलकटर, कात्री अशा साहित्याचा समावेश आहे. आतील व बाहेरील भिंती तसेच छताची रंगरंगोटी, खिडक्यांची दुरुस्ती, छतगळतीची दुरुस्ती तसेच किरकोळ कामेही केली आहेत.

"गेल्या महिन्यात आमच्या अंगणवाडीची स्मार्ट अंगणवाडीसाठी निवड झाली. दोन दिवसांत त्याचे साहित्य आले. अंगणवाडीची रंगरंगोटी केली. या सुविधांमुळे अंगणवाडीचे रूप बदलले आहे. यासाठी बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील, पर्यवेक्षिका शोभा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले."

- सुवर्णा पोवार, अंगणवाडी सेविका, सोनतळी

हेही वाचा: इचलकरंजीत ग्राहकांची लूट; 1 लिटरच्या मापकातून दिले 750 मिली पेट्रोल

"शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या अंगणवाड्याही काळाशी सुसंगत झाल्या पाहिजेत, यासाठी आदर्श अंगणवाड्या बनविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणजे अंगणवाड्यांना स्मार्ट करणे. ज्यामध्ये मुलांना ई-लर्निंगसह इतर सुविधा मिळतील."

- ज्योती पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकार

loading image