चक्रीवादळ सरकले, तरी धोका कायम

Storm impact konkan sindhudurg
Storm impact konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - अरबी समुद्रात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून पुढे सरकले असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. या वादळामुळे आज सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने किनारपट्टीला झोडपून काढले. प्रशासन अलर्ट असून आवश्‍यकता भासल्यास नदी, खाडीकिनारच्या ग्रामस्थांच्या स्थलांतराची तयारीही केली आहे. एनडीआरएफचे एक पथक तारकर्ली येथे तैनात करण्यात आले आहे. 

दरम्यान, हवामान खात्याने खोल समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याच्या किनारपट्टीस बसण्याची शक्‍यता वर्तविली असली तर येथील समुद्रात तसे मोठे बदल झालेले दिसून येत नाहीत. केवळ समुद्री लाटांची उंची काहीशी वाढली असून या चक्रीवादळाचा येथील किनारपट्टीला फटका बसण्याची शक्‍यता फार कमी आहे, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली. दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने किनारपट्टी भागातील मच्छीमारांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरली होती; मात्र दुपारी पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर नागरिकांना काहीकाळ सूर्याचे दर्शनही झाले.

सायंकाळी सहा वाजल्यानंतर पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरवात झाली. वाऱ्याचा जोर उशिरापर्यंत कायम होता; मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. उपग्रहावरून वादळाची स्थिती पाहीली असता समुद्राच्या आतून हे वादळ रत्नागिरीच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे दिसले. असे असले तरी जिल्ह्याला असलेला धोका अद्याप टळलेला नाही. यामुळे प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक मालवणात दाखल झाले असून आज सकाळी तहसीलदार अजय पाटणे यांनी या पथकासह देवबाग, तारकर्ली गावास भेट देत पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. चक्रीवादळाचा तडाखा किनारपट्टीस बसण्याची शक्‍यता असल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास त्यादृष्टीने तयार राहावे अशा सूचनाही करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी तहसील कार्यालयात चक्रीवादळ व आपत्कालीन परिस्थितीत करायच्या उपाययोजनासंदर्भात तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. यात तालुक्‍यातील सय्यद, बंडा, खोत जुवा बेटावर अनेक कुटुंबे वास्तव्यास असून खाडीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यादृष्टीने बेटांवरील ग्रामस्थांना अन्य ठिकाणी हलविण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

मच्छीमारांचा अनुभव काय सांगतोय ? 
पौर्णिमा जवळ आली असून दरवर्षी पावसाच्या सुरवातीला समुद्रात जशी स्थिती असते तशीच स्थिती सध्या येथील समुद्रात दिसून येत आहे. खोल समुद्रात चक्रीवादळ तयार झाले असले तरी त्याचा येथील समुद्रात म्हणावा तसा बदल झालेला दिसून येत नाही. सायंकाळपर्यंत समुद्र शांतच असल्याचे दिसून येत आहे. नंतरच्या टप्प्यात वाऱ्याचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा परिणाम येथील किनारपट्टीस बसण्याची शक्‍यता कमी असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रवास बंदी 
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसण्याची शक्‍यता नाकरता येत नाही. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 34 अन्वये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उद्या (ता.3) नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा विषयक बाबी वगळून अन्य कोणत्याही कारणासाठी जिल्ह्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यास बंदी केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये व वित्त हानी होऊ नये, यासाठीच्या ठोस उपाय योजना करणे आवश्‍यक असल्या कारणाने हे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

दृष्टीक्षेपात 
*किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस 
*चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले तरी धोका कायम 
*आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक तैनात 
*किनारपट्टीवरील मच्छीमारांसह, खाडी, नदी किनारच्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना 
*तातडीच्या आपत्कालीन बैठकीत सर्व प्रशासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या तहसीलदारांच्या सूचना 

""निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. किनारपट्टी भागासह तालुक्‍यातील खाडी, नदीकिनारी राहणाऱ्या ग्रामस्थांना आवश्‍यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी.'' 
- अजय पाटणे, तहसीलदार, मालवण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com