esakal | अध्यात्माची साथ, कर्करोगावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

अनिता ठाकूरदेसाई

अध्यात्माची साथ, कर्करोगावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : आजाराला घाबरून जगणं मातीमोल करण्यात काय अर्थ आहे ?’ याच दृष्‍टिकोनातून कॅन्सरवर मात करीत त्या स्वतः उभ्या राहिल्या. इतरांनाही उभे करण्यामध्ये महत्त्‍वाची भूमिका बजावली. नगरसेविका ते राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन असा प्रवास करीत अनेकांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. अाध्यात्मिक किर्तने करीत सकारात्मक जगण्याची नवी दिशा मिळवून देणाऱ्या किर्तनकार अनिता ठाकूरदेसाई यामुळे ‘नवदुर्गा’ ठरल्या आहेत. सौ. ठाकूरदेसाई या पूर्वाश्रमीच्या सुनीता ताम्हणकर. शिक्षकी पेशा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी परिसरातील मुलांची शिकवणी घेण्याला सुरुवात केली. दरम्यान अनिल ठाकूरदेसाई यांच्याशी विवाह झाला. पुढे नोकरी सोडली. मात्र, शिकवणी सुरूच ठेवली. सामाजिक सेवेचा वसा सोडला नाही.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

भाजपतर्फे त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविताना सक्षम करण्यावर भर दिला. राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले. या दरम्यान त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. या आजारालाही ठाकूरदेसाई सकारात्मकतेने सामोरे गेल्या. डॉ. अरुण आणि डॉ. छाया जोशी या दाम्पत्यासह अध्यात्मिक वाचन, कीर्तन यांच्या साथीने त्यांनी या आजारावरही मात केली. आता त्या अनेक कॅन्सरग्रस्तांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवितात. ‘भारत भोजनालया’तून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ‘बोधामृत’ या पुस्तक वाचनानंतर त्यांची अध्यात्मामधील रूची वाढली. वैशंपायन गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनकार म्हणून धडे गिरवून त्यानी कीर्तन विशारद, भागवत, वासंतिक आदी कीर्तनातील पदव्या संपादन केल्या. पुण्यामध्ये ऐशीहून अधिक कीर्तने केली. त्याद्वारे समाजप्रबोधन करत आहेत. यामागे पती अनिल आणि सासरे, कुटुंबीय यांच्यासह आई-वडिलांनी केलेले संस्कार यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्या सांगतात.

कारकिर्दीवर एक नजर..

  • भाजपतर्फे नगरसेविका म्हणून आल्या निवडून

  • महिला बालकल्याण समिती सभापतीचे भूषवले पद

  • राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन

  • अनिता ठाकूरदेसाईंना कॅन्सर झाल्याचे निदान

  • अध्यात्म, कीर्तनच्या साथीने केली आजारावर मात

  • कॅन्सरग्रस्तांशी संवाद साधून वाढवितात मनोबल

  • ‘भारत भोजनालया’तून अनेक महिलांना दिला रोजगार

  • किर्तनातील पदव्या संपादन; पुण्यात ८० हून अधिक किर्तने

"जीवनप्रवासामध्ये अनेक चढ-उतार आले. कॅन्सरसारखा आजारही जडला. मात्र, या साऱ्यावर सकारात्मक मनोबलाच्या जोरावर मात करणे शक्य झाले. हे मनोबल वाढविण्यासह जगण्याचे बळ अध्यात्माने मिळवून दिले. अध्यात्माची कास धरा अन् जीवनातील संकटाला धैर्याने मात करा."

-अनिता ठाकूरदेसाई

loading image
go to top