रिक्त पदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींना स्थानिक स्तरावर जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी 108 क्रमांकाद्वारे रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

रत्नागिरी - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांची समस्या आहे. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सर्व पदे भरण्यात येतील. तसेच पद भरतीच्या चक्राकार पध्दतीत या दोन जिल्ह्यांना प्राधान्यक्रम असेल. तसेच रत्नागिरी जवळील निवळी घाट तसेच इतर रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथील आढावा बैठकीत दिली. 

ते म्हणाले, रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींना स्थानिक स्तरावर जवळच्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी 108 क्रमांकाद्वारे रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही प्रसंगात कोल्हापूर जिल्ह्यात अथवा मुंबईत मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांना नेण्याची आवश्‍यकता असते. यासाठी 108 क्रमांकाच्या उपलब्ध सुविधेव्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था नजीकच्या काळात निर्माण करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

रत्नागिरी जिल्ह्याला रायगडशी जोडणारा पूल मेरीटाईम बोर्डाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून पूर्ण करण्यात येईल. तसेच निवळी घाट आणि इतर रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विविध नळ पाणी पुरवठा योजना तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्या योजनांना एक महिन्यात मंजुरी देणे, कार्यान्वित करावयाच्या योजनांना कार्यान्वयानांसाठी निधी उपलब्ध करून देणे, नळ पाणी पुरवठा दुरुस्तीच्या योजनांना विशेष बाब म्हणून मंजुरी प्रदान करणे आदी बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strategic Decision To Fill Vacancies Uddhav Thackeray Comment