मजबूत संघटन ही शिवसेनेची ताकद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्‍यापर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्‍यापर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सत्तेतील वर्चस्वाच्या लढाईत शिवसेना भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली. या स्पर्धेत शिवसेनेची ताकद वाढली तर भाजपनेही बाळसे धरले. तुलनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद फारच कमी झाली. परंतु निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमान पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादीत गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभेसाठी मीच उमेदवार असेन, अशी घोषणा नीलेश राणेंनी केली आहे. 

युती होवो अगर न होवो सेनेकडून राऊत यांची उमेदवारी निश्‍चित आहे. युती झाल्यास नारायण राणेंसमोर पर्याय कोणता असेल, भाजप स्वतंत्र उमेदवार देईल की राणेंच्या पक्षाला पाठिंबा देईल, राऊत आणि राणेंच्या विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, यावरच रत्नागिरी जिल्ह्यातील समीकरणे अवलंबून आहेत. 

२०१४ मध्ये मिळालेली मते
 विनायक राऊत (शिवसेना) ४९३०८८
 नीलेश राणे (काँग्रेस)     ३४३०३७

रत्नागिरीतील मतदार 
 राजापूर - २ लाख २७ हजार ३८
 रत्नागिरी - २ लाख ६३ हजार ४७६
 चिपळूण - २ लाख ५१ हजार ८४४

शिवसेना
या मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक फळी चांगली आहे. संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांचा जनसंपर्क चांगला असून संघटनेवरही पकड आहे. परंतु नाणार प्रकल्पामुळे निर्माण झालेली शिवसेनेबाबतची नाराजी,अंतर्गत गटबाजी, राज्यस्तरावरील राजकीय धोरणाबाबत शहरी मतदारांमध्ये असलेले असमाधान या गोष्टी शिवसेनेला अडचणीच्या ठरू शकतात. 

भाजप
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपकडे लोकप्रिय चेहरा नाही. मात्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी लक्ष दिल्यापासून शहरी भागातील भाजप ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ होईल. निवडणूक जिंकण्यासाठी देशस्तरावर राबवत असलेले फंडे येथेही राबवावे लागणार आहेत. 

स्वाभिमान पक्ष
माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.पण रत्नागिरी जिल्ह्यात स्वाभिमानला बळ वाढवावे लागेल. नीलेश राणे जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. राणे समर्थकांना घेऊन ते पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मेळावे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेच्या विरोधात वातावारण तापवत आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
 काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे निवडून येण्याइतके बळ सद्यस्थितीत राहिलेले नाही. दोघांची आघाडी निश्‍चित आहे, तसेच जिल्ह्यात पक्षीय धोरणांना मानणारा वर्ग मतदान करणार आहे. याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. कुणबी सेनेचे विश्‍वनाथ पाटील आणि हुसैन दलवाई यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोकण दौरा, नारायण राणेंची भेट, या सर्व घडामोडी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. 

खासदार विनायक राऊत यांचे काम, जनमानसामध्ये असलेली चांगली प्रतिमा, संघटनेवरील पकड आणि दांडगा जनसंपर्क या बळावर ते निवडून येतील. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहेत. 
- बाळा कदम,
चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा क्षेत्रप्रमुख, शिवसेना

जिल्हाध्यक्ष झाल्यापासून शहरी भागातील भाजपला ग्रामीण भागात पोचवण्याचे काम मी केले आहे. त्याचा फायदा निश्‍चित निवडणुकीत होईल. युती झाल्यास आनंद आहे. 
- बाळ माने,
भाजप जिल्हाध्यक्ष 

Web Title: The strength of Shivsena is strong organization