सिंधुदुर्गात यंदाची ऊसतोडणी धिम्यागतीने ; 30 टक्‍केच काम पूर्ण

sugarcane cutting working slowly for this year in sindhudurg
sugarcane cutting working slowly for this year in sindhudurg

वैभववाडी : जिल्ह्यातील 1 हजार 250 हेक्‍टर ऊसापैकी आतापर्यंत 30 टक्केच ऊसाची तोडणी झाली आहे. कोरोनामुळे ऊसतोडणी मजुर कमी आल्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धिम्यागतीने होणाऱ्या ऊसतोडणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षात ऊसतोडणीच्या समस्येमुळे शेतकरी ग्रासले आहेत. त्यातच यावर्षी या समस्येत आणखी भर पडल्यामुळे नव्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे. कारखाना प्रशासनाकडून कामगार वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखरकारखाना असळज (ता.गगनबावडा जि. कोल्हापूर) अस्तित्वात आल्यानंतर या कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर या तीन तालुक्‍यात ऊसाचे क्षेत्राबरोबर उत्पादन देखील वाढले. 1 लाख टन ऊसाचा टप्पा येथील शेतकऱ्यांनी पार केला होता; परंतु ऊसतोडणीच्या समस्येने हैराण झालेल्या काही शेतकऱ्यांनी ऊसशेतीतून माघार घेतली.

सध्या या तीन तालुक्‍यात सुमारे 1 हजार 250 हेक्‍टर क्षेत्र ऊसशेतीखाली आहे. यावर्षी 70 हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऊसतोडणीला सुरूवात झाली; परंतु कोरोनामुळे कारखान्याकडे ऊसतोडणी कामगार येण्याचे प्रमाण हे अत्यल्प राहिले. त्यामुळे या तीनही तालुक्‍यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच टोळ्या सुरूवातीला पाठविण्यात आल्या. त्यामुळे अतिशय धिम्या गतीने तोडणी सुरू आहे. जानेवारी संपत आला असला तरी अजून 20 ते 22 हजार टन ऊस तोडणी झाली आहे. 

अजूनही मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हलचल निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी सतत कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांकडे तोडणीविषयी विचारणा करू लागले आहेत. गेल्या आठवड्यापासून कारखान्याने तोडणी टोळ्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे काही अंशी तोडणीचा वेग वाढला आहे. ऊसतोडणीच्या समस्येमुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी ऊसलागवड बंद केली आहे. त्याच समस्येचा यावर्षी सुध्दा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे यावर्षी तोडणी कामगार कमी आले आहेत. त्याचा परिणाम एकूणच ऊसशेतीवर होण्याची शक्‍यता आहे. ऊसतोडणी कामगारांचा परिणाम नव्याने होणाऱ्या ऊसलागवड क्षेत्रावर होणार आहे. अगोदरच अनेक शेतकरी ऊसलागवडीतून बाजूला झाले आहेत. त्यामुळे आणखी काही शेतकरी ऊसशेतीपासून दूर होण्याची शक्‍यता आहे. 

पर्याय निर्माण करणे आवश्‍यक 

कोकणातील शेतकऱ्यांनी आता ऊसलागवडीसोबत ऊसतोडणीचे तंत्र समजून घेणे आवश्‍यक आहे. भविष्यात ऊसतोडणी कामगारांची कमतरता भासणार हे निश्‍ति आहे. या समस्येवर मात करण्याचा नापणे जैतापकरवाडी येथील काही शेतकऱ्यांनी प्रयोग केला आहे. येथील आठ ते दहा पुरूष आणि महिला शेतकऱ्यांनी स्वत:च्या उसाची तोडणी, भरणी करून आदर्श ठेवला आहे. 

"जिल्ह्यात ऊसतोडणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तोडणी कामगारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या मजुरांच्या 35 टोळ्या असुन पुढील आठवड्यात अजुनही वाढ करण्यात येणार आहे. आतापर्यंत 30 टक्के ऊसतोडणी पुर्ण झालेली आहे."

- भागोजी शेळके, शेती विस्तार अधिकारी, ऊस कारखाना

संपादन - स्नेहल कदम   
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com