
दुपारी साडेबाराला आंबेत पूल अचानक बंद
मंडणगड : आंबेत पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा अचानक करण्यात आल्याने स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांना बंदोबस्ताकरिता पाचारण करावे लागल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली.
खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर आज खासदार सुनील तटकरे यांनी पूल बंद करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी साडेबाराला हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अचानक बंद करण्यात आला. मात्र, सकाळी म्हाप्रळ येथील विद्यार्थी व नागरिक आपापल्या कामांकरिता पलीकडे गेले होते. सर्व प्रकारची वाहतूक बंद होत असल्याच्या घोषणेची पूर्वसूचना नसल्याने व पर्यायी वाहतूक व्यवस्था न देता पूल बंद झाल्याने स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्ताकरिता पाचारण करावे लागले.
अकरा कोटी खर्च करून दुरुस्त केलेला व दुरुस्तीनंतर काही दोष निर्माण झालेला म्हाप्रळ-आंबेत पूल आज सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी या पुलाची पाहणी केल्यावर स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या पुलावरील वाहतुकीला पर्यायी व्यवस्था करून देण्याचाही विचार करीत असल्याचे सांगितले. सात दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी पूल बंद करीत असल्याचे फलक पुलाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आले होते; परंतु अवजड वाहतूक वगळता सर्व प्रकारची सुरळीत वाहतूक या पुलावरून सुरू होती. आज अचानक कोणतीही कल्पना न देताच पूल बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
फेब्रुवारी व मार्चमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा आहेत. अनेक विद्यार्थी शाळेसाठी आंबेत व गोरेगाव या ठिकाणी जात असल्याने ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे, तसेच होळी सणानिमित्त पालखीसाठी मुंबई-पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांनाही महाडमार्गे २५ किलोमीटर लांबीचा वळसा घालत तालुका गाठावा लागणार आहे.
पर्यायी व्यवस्थेबाबत खुलासा नाही
पुलावरील वाहतुकीस पर्याय देण्यापूर्वीच सर्व प्रकाराची वाहतूक बंद करण्यात आल्याने काही काळ संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांची वाहतुकीची पर्यायी व्यवस्था कशा प्रकारे केली जाणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग वा संबंधित अन्य यंत्रणांनी अद्याप कोणताही जाहीर खुलासा केलेला नाही.
Web Title: Sunil Tatkare Ambet Bridge Sudden Closed Police Security
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..