
आयलॉगच्या जेटी प्रकल्पाला समर्थन देणारे स्थानिक नाहीत. जे समर्थन करीत आहेत ते केवळ स्वार्थासाठी पुढे आले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी कंत्राट मिळावे, यासाठीच त्यांनी खटाटोप सुरू केला आहे.
रत्नागिरी - आयलॉग जेटीला जे समर्थन होत आहे, ते केवळ स्वार्थासाठी आहे. हा प्रकल्प मुळातच मच्छीमारांसाठी घातक आहे. आंबोळगडमध्ये केवळ जेटी उभारण्यात येणार नसून या जेटीआडून औष्णिक प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी नंदकुमार हळदणकर, सुनील खानविलकर, करीम फणसोपकर यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार उपस्थित होते. आंबोळगड येथील जेटी प्रकल्पाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थगिती दिली. यानंतर प्रकल्पाच्या समर्थनात आणि विरोधात उघड चर्चा सुरू झाली आहे. आज प्रकल्प विराधातील ग्रामस्थ आणि मच्छीमार एकत्र आले.
ते म्हणाले, आयलॉगच्या जेटी प्रकल्पाला समर्थन देणारे स्थानिक नाहीत. जे समर्थन करीत आहेत ते केवळ स्वार्थासाठी पुढे आले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी कंत्राट मिळावे, यासाठीच त्यांनी खटाटोप सुरू केला आहे. प्रत्यक्षात आयलॉगचा जेटी प्रकल्प हा मच्छीमारांसाठी मारक आहे. याचा मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. जेटी संरक्षणासाठी समुद्रात नाटे ते वेत्ये अशी संरक्षक भिंत टाकण्यात येणार आहे. या भिंतीमुळे वेत्ये बंदर गाठण्यासाठी मच्छीमारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय भविष्यात हा भाग सुरक्षित झोन म्हणून घोषित केला जावू शकतो याचा मोठा फटका मच्छीमारांना बसेल.
आयलॉगमार्फत जेटीसह अन्य प्रकल्प येथे प्रस्तावित केले आहेत. प्रत्यक्षात जेटीच्या आडून औष्णिक प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे. कंपनीने स्थानिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या प्रकल्प अहवालात त्याची नोंद आहे. येथील ग्रामस्थांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसायावर एक हजार इतका रोजगार येथे निर्माण झाला आहे. भविष्यात यात वाढही होईल. परंतु कोणत्याही भुलथापांना येथील स्थानिक जनता फसणार नाही. आमचा याला विरोध असेल, असे त्यांनी सांगितले.
आंबोळगड आणि नाटे परिसरात बॉक्साईड, लोहखनिज मोठ्या प्रमाणावर आहे. यावर आधारित रेड कॅटॅगिरीतील उद्योगधंदे आंबोळगड आणि नाटे परिसरात आणले जाणार आहेत. परंतु येथील स्थानिक जनतेने कोणतेही प्रदूषणकारी प्रकल्प येथे होवू न देण्याचा निर्धार केला आहे.