स्वाभिमानच्या पेरणीने शिवसेना बेजार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

जठार यांचा बंडाचा झेंडा 
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यामुळे भविष्यात ही मते तिकडे वळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना मताधिक्‍य देण्याच्या दृष्टीने सेनेला सावध भूमिका घ्यावीच लागणार आहे. 

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना-भाजपने युती जाहीर केली. मात्र रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील युतीमुळे गोडवा निर्माण होण्याऐवजी कटुता अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मित्रपक्षाचे हे संकेत सेनेची रुखरुख वाढविणारे आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही जिल्हा परिषद गटनिहाय फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याने सेना बेजार झाल्याचे दिसते. सत्तेच्या या सारीपाटात युती म्हणून मतदारसंघातील मताधिक्‍य टिकविताना सेनेला कसरत करावी लागणार आहे. 
 
शिवसेना-भाजप हे तालुक्‍यातील दोनच मोठे पक्ष आहेत. युती होऊन दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे युतीची ताकद वाढल्याचे चित्र असल्याचे अंदाज बांधले गेले मात्र ते वरचेवरचे आहेत. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. युती म्हणून गेल्या लोकसभेला खासदार विनायक राऊत यांना चांगले सहकार्य करून निवडून दिले, असे भाजपने स्पष्ट केले. मात्र पाच वर्षांमध्ये खासदार राऊत यांनी भाजपचा भ्रमनिरास केल्याचे जबाबदार पदाधिकारी थेट म्हणत आहेत. यावरून युतीमुळे गोडव्याऐवजी कटुता अधिक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जोवर सेना - भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन निर्णय होत नाही, तोवर ही धुसफूस सुरूच राहणार असल्याचे दिसते. युती होऊन दोन दिवस होत नाहीत, तोवर उघड - उघड भाजपचे पदाधिकारी सेनेला कात्रीत पकडत असल्याने आगामी लोकसभेसाठीची ही धोक्‍याची घंटा आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सेनेला जास्तीत जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद गटनिहाय त्यांनी घुसखोरी सुरू करून सेनेला पोखरण्याचे काम सुरूच आहे. काही गटांमध्ये त्यांना यश आले. सेनेमार्फत अनेक विकासकामे सुरू झाली, मात्र तांत्रिक कारणामुळे ती थांबली. नीलेश राणे यांनी आपल्या ताकदीवर ही कामे करून घेत लोकांची सहानुभूती मिळवली. युती म्हणून मतदारसंघात ताकद वाढली असली तरी या सहानुभूतीचा विपरित परिणाम मताधिक्‍य घटविण्यावरही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जठार यांचा बंडाचा झेंडा 
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यामुळे भविष्यात ही मते तिकडे वळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना मताधिक्‍य देण्याच्या दृष्टीने सेनेला सावध भूमिका घ्यावीच लागणार आहे. 

Web Title: Swabhimaan - Shivsena politics special