नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानचा उपसभापती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सावंतवाडी - येथील पंचायत समिती उपसभापतिपदी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानच्या संदीप नेमळेकर यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भरलेल्या मनीषा गोवेकर यांचा एका मताने पराभव केला. आजारी असल्याने एक सदस्य अनुपस्थितीत राहिला. काँग्रेसने व्हिप बजावल्यानंतरही स्वाभिमानने बाजी मारली. स्वाभिमानविरोधात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आली होती. 

सावंतवाडी - येथील पंचायत समिती उपसभापतिपदी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानच्या संदीप नेमळेकर यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भरलेल्या मनीषा गोवेकर यांचा एका मताने पराभव केला. आजारी असल्याने एक सदस्य अनुपस्थितीत राहिला. काँग्रेसने व्हिप बजावल्यानंतरही स्वाभिमानने बाजी मारली. स्वाभिमानविरोधात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आली होती. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्या सौ. गोवेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्याचा दावा करीत अर्ज दाखल केला होता; मात्र काँग्रेसने बजावलेली व्हीप धुडकावून लावत आठ विरुद्ध ९ अशा मतांनी नेमळेकर विजयी झाले. येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक आज झाली. निवडीच्या आदल्या दिवशीपर्यंत चुरस होईल, अशी अजिबात शक्‍यता नव्हती. पंचायत समितीत स्वाभिमानकडे असलेले सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमानची स्थापना केल्यानंतर बहुसंख्य सदस्य स्वाभिमानचे झाले.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमानविरोधात काँग्रेस, शिवसेना व भाजपने एकत्र येत आज सकाळपासूनच राजकीय व्यूहरचना आखायला सुरवात केली. यात महाराष्ट्र स्वाभिमानच्या गोटात असलेल्या सौ. गोवेकर यांना उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. हात या निशाणीवर निवडून आलेल्या सर्व अकराही सदस्यांना व्हीप बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

याबाबतची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. ‘पक्षाविरोधात जाणाऱ्या सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी गोवेकर यांना मतदान करावे; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी दिला. त्यामुळे चुरस निर्माण झाली.

स्वाभिमानकडे असलेल्या गौरी पावसकर यांनी हा व्हीप स्वीकारला. यामुळे पावसकर यांनी स्वाभिमानच्या विरोधात मतदान केल्यास टाय होण्याची शक्‍यता होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रक्रिया पार पडली.’’ यावेळी त्याठिकाणी मतदान झाले. तत्पूर्वी काँग्रेसने बजावलेला व्हीप वाचून दाखवावा, अशी मागणी पक्षाने केली, परंतु त्याला सदस्य रवींद्र मडगावकर यांनी विरोध केला. व्हीप पक्षाचा विषय आहे. त्यामुळे त्याचा या निवड प्रक्रियेची काही संबंध नाही, असे सांगून म्हात्रे यांनी व्हीप वाचण्यास नकार दिला. यावेळी व्हीप स्वीकारलेल्या गौरी पावसकर गैरहजर होत्या. त्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. अखेर मतदान प्रक्रिया झाली. यात आठ विरुद्ध ९ अशा मतांनी श्री. नेमळेकर यांची निवड करण्यात आली. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात जल्लोष केला. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, गीता परब, शेखर गावकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, बाबू सावंत, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, जावेद खतीब, मनोज नाटेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, उन्नती धुरी, संतोष कांबळे, सुनंदा राऊळ, शर्वरी बागकर, निकिता सावंत आदी उपस्थित होत्या.

Web Title: Swabhiman Upsabhapati elected in Sawantwadi