जिल्ह्यातील पत्रकारीता समाजाभिमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

कुडाळ - पत्रकारिता या चौथ्या स्तंभावर जनतेचा आजही विश्‍वास आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता ही समाजाभिमुख आहे. त्यामुळे पत्रकारांना समाजातील सर्व माहिती जनतेकडून विश्‍वासने पहिल्यांदा कळते. खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे काम पत्रकारांकडून होत आहे, असे मत कणकवलीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी तेंडोली येथे तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

कुडाळ - पत्रकारिता या चौथ्या स्तंभावर जनतेचा आजही विश्‍वास आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता ही समाजाभिमुख आहे. त्यामुळे पत्रकारांना समाजातील सर्व माहिती जनतेकडून विश्‍वासने पहिल्यांदा कळते. खऱ्या अर्थाने समाज घडविण्याचे काम पत्रकारांकडून होत आहे, असे मत कणकवलीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी तेंडोली येथे तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा तेंडोली-भोमवाडी येथे तेंडोलीचे पोलिसपाटील संजय नाईक यांच्या फार्म हाऊसवर आयोजित केला होता. व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, साप्ताहिक व्याधच्या संपादिका संजीवनी देसाई, सरपंच नंदा गोडे, पंचायत समिती सदस्या माधवी प्रभू, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रमोद ठाकूर उपस्थित होते. तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकार तथा व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार मधुसुदन नानिवडेकर यांना तर वसंत दळवी स्मृती जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकार पुरस्कार अनिल निखार्गे आणि जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्कार पाट येथील प्रकाश मयेकर यांना श्री. शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमात वेंगुर्ले नगर वाचनालयाने जाहीर केलेला स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार श्रीकृष्ण सौदागर आदर्श पत्रकार पुरस्कारप्राप्त चंद्रकांत सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा वरिष्ठ पत्रकार पुरस्कारप्राप्त प्रमोद ठाकूर व राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारप्राप्त काशिराम गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी आस्था आनंद मर्गज, जान्हवी रवींद्र गावडे, मृणाल अजय सावंत, अनुष्का अजय सावंत, वेदांत भरत केसरकर, हर्षवर्धन नीलेश जोशी, श्रुती रजनीकांत कदम या पाल्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

श्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘‘सोशल मीडियाच्या या झंझावातात प्रिंट मीडिया कुठे असा प्रश्‍न सर्रास विचारला जातो; पण प्रिंट मीडियावर आजही पूर्वी एवढाच वाचकांचा विश्‍वास आहे. येथील पत्रकारिता विश्‍वासास पात्र ठरणारी आहे.’’

श्री. वायंगणकर, श्री. नानिवडेकर, श्री. निखार्गे, श्री. मयेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, पोलिसपाटील संजय नाईक, उपसरपंच नामदेव कुंभार, तेंडोली सोसायटी चेअरमन मंगेश (भाऊ) प्रभू, माजी सरपंच संदेश प्रभू व सौ. अरुणा राऊळ, भाजपचे तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई व जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप, प्रज्ञा राणे, उषा आठल्ये, श्रेया गवंडे, विजय प्रभू, संदीप राऊळ, श्रीमती सुरेखा नीाक, ग्रामपंचायत सदस्य उमेश राऊळ, अरुण राऊळ, गुंडू गोडे, बाळा परब, मोहन राऊळ, सूर्याजी नाईक, चित्रकार प्रकाश कब्रे, सचिन मांजरेकर, मधुकर कुडाळकर, सौ. निखार्गे, प्राची मयेकर, प्रणाली मयेकर, अपूर्वा नानिवडेकर, श्री. ठाकूर-देसाई उपस्थित होते. पोलिसपाटील संजय नाईक यांचा कृषी क्षेत्रातील कामगिरीबाबत विशेष सत्कार झाला. नीलेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विलास कुडाळकर यांनी स्वागत केले. प्रमोद ठाकूर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Web Title: Taluka patrakar samittee puraskar