राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र रत्नागिरीत

राजेश कळंबटे
Sunday, 18 October 2020

रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रुग्णालय कोविड रुग्णासाठी केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आठ दिवसात कार्यवाही करतील.

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेतला असून नुकसानीचा आकडा 10 ते 12 हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - वैद्यकीय महाविद्यालय आता रत्नागिरीतही : उद्धव ठाकरे -

येथील अल्पबचत सभागृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हरचिरी, चांदेराई येथे नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्यातील आढावा घेतला. त्यामध्ये चारही तालुक्यात प्रत्येकी 1500 ते 2000 हेक्टरपर्यंत भातशेती बाधित झाली आहे. नुकसानाचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. कोकणातील माहिती घेण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत. 

बाधित शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्यासाठी मागणी करण्यात येईल. हेक्टरी 6,800 रुपयात वाढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत सामंत म्हणाले, जिल्हा कोविड रुग्णालयात 66 रुग्ण उपचार घेत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रुग्णालय कोविड रुग्णासाठी केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आठ दिवसात कार्यवाही करतील. जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ते सॅनिटाईज केले जाईल. 

हेही वाचा - चिपळूणात 91 हजारांचा साडेचार किलो गांजा जप्त -

रत्नागिरी पालिकेने सुरु केलेल्या आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरु केले जाईल. कोविड झाल्यानंतर रुग्णांना दिसणार्‍या लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र राहील. सर्वसामान्यांना या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्यातील ते पहिले रुग्णालय आहे. दरम्यान, शिक्षण संस्थांमधील विविध प्रश्‍न जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. कोरोनामुळे थांबलेली प्राचार्य, प्राध्यापक भरती पुन्हा सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेड बदलून घेण्यासाठी प्रयत्न

निसर्ग वादळातील नुकसान झालेल्या बागायतदारांच्या भरपाईत वाटपातील अडथळा लवकरच दूर करू. एका सातबार्‍यावर अनेक नावे हा अडथळा आहे. घरा, गोठ्यांच्या नुकसानभरपाईसाठी आलेल्या173 कोटीतील 55 कोटी शिल्लक आहेत. बागायतदारांसाठी साडेआठ कोटी रुपये लागणार असून ते आलेले नाहीत, आलेल्या निधीतून ते वाटपहोण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्‍वासन सामंत यांनी दिले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tate first post covid counseling center in ratnagiri said uday samant in ratnagiri