शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता सुगम, दुर्गमाचा खेळ

- प्रकाश पाटील
बुधवार, 8 मार्च 2017

सावर्डे - केवळ शिक्षकांसाठीच शासनाचा नवा आदेश काढण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक बदल्या व त्यावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये उडणारे खटके, दबाव हा नित्यक्रम होत आहे. हे सारे टाळण्यासाठी यापुढे सुगम (सर्वसाधारण क्षेत्र) व दुर्गम (अवघड क्षेत्र) या दोन प्रकारांत विभाजन करून बदल्यांचे नियोजन करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.

सावर्डे - केवळ शिक्षकांसाठीच शासनाचा नवा आदेश काढण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक बदल्या व त्यावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये उडणारे खटके, दबाव हा नित्यक्रम होत आहे. हे सारे टाळण्यासाठी यापुढे सुगम (सर्वसाधारण क्षेत्र) व दुर्गम (अवघड क्षेत्र) या दोन प्रकारांत विभाजन करून बदल्यांचे नियोजन करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.

शिक्षकांची मोठी संख्या, इतर कर्मचाऱ्यांच्यापेक्षा त्यांच्या कामाचे भिन्न स्वरूप, कामात उद्‌भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन शिक्षकांना केंद्रबिंदू मानून हा आदेश काढण्यात आला आहे. वरकरणी तो चांगला वाटत असला तरी अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित करताना शिक्षण विभागाला घाम फुटणार आहे. 

सुगम व दुर्गम शाळेची यादी करताना घोळ वाढेल अशी चर्चा प्रशासकीय व शिक्षक वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी शिक्षक सेवा कालावधी व एकूण शिक्षक संख्येच्या टक्केवारीचे प्रमाण विचारात घेऊन जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या केल्या जात. परंतु १५ मे २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या जिल्हास्तरावर करण्याऐवजी तालुकास्तरावर १० टक्के करण्याचा आदेश निघाला. २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यात ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. नव्या आदेशानुसार १० टक्के प्रशासकीय बदलीची टक्केवारी आता रद्दबातल झाली. त्या जागी आता सुगम, दुर्गम शाळा असे निकष ठेवण्यात आले आहेत. तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळण, रस्ता, दुर्गम, डोंगराळ भाग, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती अशी भौगोलिक परिस्थिती असणारी गावे म्हणजे अवघड (दुर्गम) क्षेत्र, तर दळणवळणाची चांगली सोय असणारी सर्वसाधारण (सुगम) क्षेत्रातील गावे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारात निश्‍चित केली जाणार आहेत. 

टक्केवारीचा विषय संपल्याने नव्या आदेशानुसार सर्वच शिक्षक बदलीसाठी पात्र ठरतील; मात्र त्यामध्ये अटी घालण्यात आल्या आहेत. दुर्गम भागात सलग तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना सुगम भागात पाठविले जाणार आहे, तर दहा वर्षे सुगम भागात सलग सेवा करणाऱ्या शिक्षकांना दुर्गम भागात पाठवले जाणार आहे. 

शासनाच्या ग्राम विकास खात्याच्या शिक्षक बदलीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रथम अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर क्षेत्रे निश्‍चित झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस मे महिन्यापर्यंत बदल्या होण्याची शक्‍यता आहे.
 - एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

Web Title: teacher transfer planning