आशा धुळीस मिळाल्या आहेतच, आता आम्हाला प्रतीक्षा फक्त विनंती बदल्यांची !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

दल्यांची प्रक्रिया करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने विनंती करणाऱ्या शिक्षकांचा हिरमोड झाला आहे

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विनंती बदल्यांच्या माध्यमातून गतवर्षी दुर्गम भागात गेलेल्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता होती; मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने विनंती करणाऱ्या शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. शिक्षण विभागाकडे पावणेचारशे प्रस्ताव आले आहेत.

हेही वाचा -  पोलिसांची धावपळ, तरीही `तिचे` गुढ कायमच  

 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरतात. यंदाही कोरोनातील परिस्थितीमुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया थांबलेली आहे. एकाचवेळी शेकडो शिक्षकांना एकत्र आणून बदली प्रक्रिया राबवणे कोरोनामुळे अशक्‍य असल्याने प्रशासकीय बदल्या रद्द केल्या; मात्र शिक्षकांना दिलासा देण्यासाठी शासनाने विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. बहुतांश जिल्ह्यात विनंती बदल्या केल्या. तरीही जिल्ह्यातील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. गणशोत्सवानंतर निर्णय होईल, अशी व्यक्त होणारी अपेक्षा फोल ठरली. अजूनही पदाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळालेला नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, आंतरजिल्हा बदल्या होण्यापूर्वी विनंती बदल्या कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - गोव्यातून आणायचा अन् घरात साठा करायचा, छापा पडताच भांडाफोड

 

बदल्या रद्द झाल्याने आशा धुळीस 

बदल्यांची प्रक्रिया होणार असल्यामुळे गतवर्षी बदली झालेल्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ऑनलाइन बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या किंवा चुकीने दुर्गम भागात नियुक्‍ती झालेल्या शिक्षकांना यंदा सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली होती. प्रशासकीय बदल्या रद्द झाल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. विनंती बदल्याच्या माध्यमातून तालुक्‍याबाहेर गेलेले शिक्षक आपल्या तालुक्‍यात येण्यासाठी धडपडताहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teachers are waiting for transfer proposal waiting for government decision in ratnagiri