‘कोरे’च्या दहा एक्स्प्रेस विजेवर धावणार

महाराष्ट्र दिनी प्रारंभ; वेळेची बचत व प्रदूषणाला आळा
कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण.
कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण.Sakal

रत्नागिरी - इंधन बचत, प्रदूषण टाळणे यांसह मेल, एक्स्प्रेस गाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर नुकतेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर कोकण रेल्वेने महाराष्ट्र दिनाचे (ता. १) औचित्य साधून पहिल्या टप्प्यात दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेसचा समावेश आहे.

विद्युतीकरणामुळे कोकणरेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त तसेच वेगवान होईल. रोहा ते ठोकूर असा ७०० किमीचा कोकण रेल्वेचा मार्ग आहे. या पट्ट्यातील विद्युतीकरणाचे काम २०१५ पासून हाती घेण्यात आले. विद्युतीकरणाचे काम सहा टप्प्यात हाती घेतले होते. यासाठी ११०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे टप्पे होते. या सर्व टप्प्यांची कामे पूर्ण करण्यात आली. कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. विद्युतीकरण नसल्यामुळे एखाद्या पट्ट्यात लांब पल्ल्याच्या गाड्या धावताना समस्या येत होती. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जोडल्या जात होत्या. त्यापुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील लोको जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या आता दूर झाली आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरीचे काम पूर्ण झाले होते. या मार्गावर पहिले विजेचे इंजिन लावून गाडी चालवण्यात आली. त्यात कोणत्याही अडचणी आल्या नव्हत्या. त्यानंतर पुढील टप्प्यात रत्नागिरी ते मडगावचे काम पूर्ण करण्यात आले.

या एक्स्प्रेस धावणार

रेल्वे सुरक्षा पथकाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर सर्व गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विजेचे इंजिन जोडून मंगळुरू सेंटर ते मडगाव पॅसेंजर विशेष, तिरुवनंतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह मंगला एक्स्प्रेस, मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या चालविण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com