सभापतीपदावरुन शिवसेनेतच धुमशान, फळसकरांनी मारली बाजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शिवसेनेत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सपना मालुसरे यांचे नाव निश्चित असतानाही दत्ताराम फळसकर यांना सहा मिळाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली. या घटनेमुळे शिवसेनेत अंतर्गत गटबाजीचे संकेत मिळू लागले आहेत.

महाड - शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणूकीत सभापतीपदावरुन शिवसेनेमध्येच दोन गटात धुमशान झाल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सपना मालुसरे यांचे नाव निश्चित असतानाही दत्ताराम फळसकर यांना सहा मिळाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली. या घटनेमुळे शिवसेनेत अंतर्गत गटबाजीचे संकेत मिळू लागले आहेत.

महाड पंचायत समितीच्या सभापतीपदी सर्वांना संधी मिळावी या धोरणानुसार शिवसेनेचे सभापती सिताराम कदम यांनी राजीनामा दिला होता. त्याठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर सभापतीपदाची निवड आज घेण्यात आली. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाड पंचायत समितीत 10 पैकी 9 सदस्य शिवसेनेचे असून 1 सदस्य काँग्रेसचा आहे. सभापती पदासाठी शिवसेनेकडून सपना मालुसरे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु अर्ज दाखल करण्याच्या वेळी दत्ताराम फळसकर यांनीही या पदासाठी आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे शिवसेनेत उघडउघड दोन तट निर्माण झाले. अखेर निवडणूकीसाठी हाताची बोटे वर करून मतदान घेण्यात आले. त्यावेळी दत्ताराम फळसकर यांना सदानंद मांडवकर, वसंत बटावले, शुहेब पाचकर, शेलार, अपर्णा येरुणकर यासदस्यांह स्वतःचे अशी सहा मते मिळाली. तर सपना मालुसरे स्वतचे, सिताराम कदम, सिध्दी खांबे, ममता गांगण अशी चार मते मिळाली. त्यामुळे सभापतीपदासाठी अखेर दत्ताराम फळसकर यांनी बाजी मारली.

निवडणूक प्रक्रियेनंतर शिवसेनेतील दोन गट एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले. पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहातच कार्यतर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये काही सदस्यांना मारहाणही झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान या प्रकरणी सपना मालुसरे यांचे मतदार संघ असलेल्या वरंध भागातील कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. वरंध विभागातील कार्यकर्त्ये याबाबत लवकरच काहीतरी निर्णय घेतील असेही कार्यकर्ते या ठिकाणी ओरडून सांगत होते. प्रचंड संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी फळसकरांना मते देणाऱ्या सदस्यांचे राजिनामे घ्यावेत अशीही मागणी केली.

दोन गटात जुंपलेल्या या वादामुळे पंचायत समिती प्रशासनाने अखेर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या ठिकाणी त्वरीत बंदोबस्त ठेवला. संपूर्णपणे बहुमत असलेल्या या पंचायत समितीत सभापती पदावरून निर्माण झालेला हा वाद विधानसभा निवडणूकीपर्यंत कायम राहतो की यावर तोडगा काढण्यात वरिष्ठांना यश येते याकडे सर्वांचेच व विरोधकांचेही लक्ष लागले आहे. याबाबत तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या बाबतचा निर्णय आमदार भरत गोगावले घेतील. आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे स्पष्ट केले. शिवसेनेत झालेल्या या भूकंपावर आमदार भरत गोगवाले यांना तातडीने तोडगा काढावा लागेल असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.आमदार भरत गोगवाले मुंबईत असल्याने त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.
 

Web Title: Tension in the Shiv Sena because of the chairmanship of the post of the Speaker