esakal | Good News - तेरेखोल नदीवर आता पूर अलार्म सिस्टीम
sakal

बोलून बातमी शोधा

Good News - तेरेखोल नदीवर आता पूर अलार्म सिस्टीम

Good News - तेरेखोल नदीवर आता पूर अलार्म सिस्टीम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बांदा : शहरातील पूरबाधित व्यापाऱ्यांना २०१९ च्या अध्यादेशानुसारच भरपाईची वाढीव रक्कम मिळणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत. पुराची माहिती आगाऊ देण्यासाठी व मोठे नुकसान टाळण्यासाठी तेरेखोल नदी किनाऱ्यावरील बांदा, शेर्ले, इन्सुली, विलवडे, माडखोल येथे अलार्म सिस्टीम कार्यान्वित करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

त्यांनी शहरात महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा बांदा ग्रामपंचायत सभागृहात घेतला. पोलिस प्रशासनाने पूरस्थितीची कल्पना न दिल्याने नुकसानीचा आकडा वाढल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. केसरकर यांनी पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना खडेबोल सुनावले. तहसीलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसीलदार प्रदीप पवार, बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, माजी सभापती अशोक दळवी, तलाठी वर्षा नाडकर्णी, कृषी मंडळ अधिकारी रूपाली पापडे, सुशांत पांगम, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, श्यामसुंदर मांजरेकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘व्यापारी व ग्रामस्थांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. नुकसानीसंदर्भात मोठ्या व्यापारी पेठांच्या धर्तीवर बांदा शहरातील व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. शासन पातळीवर व्यापाऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री ठाकरे यांना कोकणाबद्दल आस्था असल्याने लवकरच भरपाईची रक्कम खात्यावर जमा होईल. तातडीने पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर भरपाई देण्यासंदर्भात बँका व इन्शुरन्स कंपन्यांशी बोलणी करण्यात येईल. भविष्यात नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून नियोजन करण्यात येईल.’’

हेही वाचा: सह्याद्री रांगेतील गावांची स्थिती गंभीर; डोंगरांना गेल्या भेगा

व्यापाऱ्यांच्या वतीने भय्या गोवेकर, मंथन गवस, सर्वेश गोवेकर, भाऊ वाळके, राकेश केसरकर, देवा माने यांनी समस्या मांडल्या. सर्वेश गोवेकर यांनी नदीपात्रातील गाळ काढल्यास पूरस्थिती ओढवणार नसल्याचे सांगितले. पेडणे तालुक्यातील जनता बांदा बाजारपेठेवर अवलंबून असल्याने दत्त मंदिराकडील पोलिस लाठी काढण्याची मागणी झाली.

वाळके म्हणाले, ‘‘प्रशासनाने तेरेखोल नदीची पातळी दररोज जाहीर करावी. पोलिस प्रशासन नियमांवर बोट ठेवत कोरोना कालावधीत दुकाने बंदची सक्ती करते, मग आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची सूचना का दिली नाही?’’ बांदा पूरबाधित क्षेत्र असूनही येथे दिलेली लाईफ बोट परस्पर चिपळूण येथे पाठविण्यात आली. त्यामुळे येथील गंभीर पूरस्थितीला व झालेल्या नुकसानीला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. यावर स्पष्टीकरण देताना पहाटे पाचला शहरात पुराचे पाणी आले नसल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितल्याने व्यापारी संतप्त झालेत. केसरकर यांनी जाधव यांना धारेवर धरले.

स्वनिधीतून लाईफ बोट बांद्यासाठी दिली असताना कोणाच्या आदेशाने ती परस्पर चिपळूणला पाठविली, तुम्हाला होड्या या लोकांना वाचविण्यासाठी दिल्या आहेत. आपण लोकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्याशी संयमाने बोलावे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांना सूचित केले असते, तर नुकसान काही प्रमाणात टाळता आले असते. यासंदर्भात तुमच्याविरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार असून याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, असे श्री. केसरकर यांनी सभेत सांगितले.

बँकांनी व्यापाऱ्यांना चालना देण्यासाठी तीन वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, बांदा शहरातील शासकीय जमिनीत माल साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. बांदा ग्रामपंचायतीला फायबर बोट घेण्यासाठी आमदार निधीतून ४० हजार रुपये रक्कम मंजूर करण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले. येथे बाहेरील अनेक व्यापारी भाडेतत्त्वावरील दुकाने घेऊन व्यापार करतात. त्यांच्याकडे असेसमेंट उतारा नसल्याने ते भरपाईपासून वंचित राहणार आहेत. त्यासंदर्भात देखील महसूल विभागाला सूचना केल्याचे केसरकर म्हणाले.

हेही वाचा: पुढील 5 दिवस रत्नागिरी - कोल्हापूर हायवे वाहतूकीसाठी बंद

बांदा-पत्रादेवी येथे अडथळा ठरत असलेली पोलिस लाठी तत्काळ बंद करण्यासाठी आजच पोलिस अधीक्षकांशी चर्चा करू, अशी ग्वाही केसरकर यांनी व्यापाऱ्यांना दिली. पुराच्या पाण्यात जाऊन लोकांचे जीव वाचविणाऱ्या प्रीतम हरमलकर, तुषार धामापूरकर, सुभाष शिरोडकर, बाबलो धामापूरकर व युवकांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गाळ उपसणार

भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून आरोंदा ते बांद्यापर्यंत तेरेखोल नदीपात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुराची तीव्रता कमी होणार आहे. नदीपात्रातील गाळ उपसा करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न बांद्यात होणार आहे. यासंदर्भात आपण थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

२० कोटींचे नुकसान

बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शहरात नुकसानीचे सरसकट ४६७ पंचनामे झाले असून, एकत्रित नुकसानीचा आकडा २० कोटी रुपये असल्याची माहिती दिली. सर्व पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्यात आले आहेत.

हेही वाचा: गोव्यातील 'या' महत्वाच्या गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या

loading image
go to top