esakal | उधाणाच्या भरतीने मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

उधाणाच्या भरतीने मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा

हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने भिती कायम आहे.

उधाणाच्या भरतीने मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: उधाणाच्या भरतीने मिऱ्या बंधाऱ्याला पुन्हा तडाखा दिला आहे. आतापर्यंत बंधाऱ्याची धूप होत होती. आता ज्या ठिकाणी बंधारा नाही, अशा कांबळेवाडी भागात मोठ्या प्रमाणात वाळुची धूप झाली असून रस्ताही वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मिऱ्या वासीयांच्या पोटात पुन्हा भितीचा गोळा आला आहे. हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने भिती कायम आहे.

हेही वाचा: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

जिल्ह्यात आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने पुरती दाणादाण उडवून दिली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. समुद्रालाही उधाण असल्याने मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहात झाली आहे. या भागातील जवळपास पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यात देखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. नुकत्याच झालेल्या अमावास्येनंतर आलेल्या उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडवून दिली. पुढील काही दिवस रत्नागिरी आजच्या उधाणाच्या लाटांचे तांडव किनारपट्टी भागात पाहायला मिळाले. आलावा-पाटीलवाडी, १५ माड परिसर, जयहिंद चौकामागील परिसरात उधाणाचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने काही काळ भितीचे वातावरण होते.

हेही वाचा: चक्रीवादळांचा धोका ; रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्रिसूत्री

आतापर्यंत समुद्राच्या पाण्याचा प्रचंड दाब संरक्षक बंधाऱ्यावर पडत असल्याने ठिकठिकाणी तो वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याची दुरुस्ती केली आहे. मात्र आता ज्या ठिकाणी बंधारा नाही, अशाभागात समुद्राचे अतिक्रमण होत आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांबळेवाडीतील किनाऱ्याची धूप झाली आहे.

हेही वाचा: Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

किनाऱ्याची वाळू वाहून गेली

उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा मिऱ्या किनाऱ्याला बसला आहे. पंधरामाड-कांबळेवाडी येथील किनारा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत असल्याने किनाऱ्याची वाळू समुद्रात वाहून गेली आहे. किनाऱ्यावर दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तत्काळ उपाययोजना न आखल्यास मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

loading image