esakal | शिवसेनेची संघटनात्मक बांधणी हे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी हे आव्हान

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : मुंबईत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मात देणे, हे केंद्रीय मंत्री नारायण राणे व भारतीय जनता पक्षासाठी सहज सोपी गोष्ट नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने सर्व प्रकारची ताकद लावूनही ते शक्य झाले नाही. शिवसेनेची संघटनात्मक तटबंदी हेच त्याचे मुख्य कारण राहिले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक नारायण राणे यांना व पर्यायाने भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असून, नगरविकास खाते शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेले मंत्रिपद ही शिवसेनेसाठी सर्वांत जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरेल.

शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी संघटनेची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहेच, शिवाय मुख्यमंत्री म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. कोरोना आणि महापुराच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अॅड. आशिष शेलार, माजी खासदार, किरीट सोमय्या, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, राम कदम आदींनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तरीही ठाकरेंनी संयमाने व खंबीरपणे केलेले कामही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या प्रतिमेचा फायदाही शिवसेनेला निश्चितच होणार आहे.

हेही वाचा: कोकणातील चिपी विमानतळावरुन श्रेयवाद रंगणार; राणेंनी केली 'ही' घोषणा

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या वेळी मुंबईची निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नाराय़ण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे राणे आणि भाजप विरोधात युवासेनेची टीमही जोमाने कामाला लागणार, हे निश्चित आहे.

चाकरमानी रात्रीत निवडणुकांचे बदलतात चित्र

नाराय़ण राणे मुंबईच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी कोकणातील शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री आणि पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी निवडणुकीच्या मैदानात उतरतील, हे स्पष्ट आहे. मुंबईतील चाकरमानी गावात येऊन एका रात्रीत कोकणातील निवडणुकांचे चित्र बदलतात तसेच कोकणातील शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई महापालिका निवडणुकीचे चित्र बदलतात. त्यामुळे राणे आणि भाजपसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक सोपी नाही.

मुंबईतील चित्र पाहता, अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईकरांना सहज उपलब्ध होतात. गटप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंत प्रत्येकाचा सामान्यातल्या सामान्य माणसाशी संपर्क असतो. गेल्या काही वर्षांपासून युवासेनेनेही मुंबईत चांगलेच बस्तान बसविले आहे. इतर पक्षांकडे गेलेला युवावर्ग पुन्हा शिवसेनेकडे येत आहे. या वेळी शिवसैनिक अधिक आक्रमक होऊन निवडणुकीत उतरतील.

- राजन साळवी, आमदार, लांजा-राजापूर

loading image
go to top