पोलिसाच्याच मुलाचा घरावर डल्ला 

विनोद दळवी 
Wednesday, 25 November 2020

सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी या पोलिसपुत्र चोराला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल 4 लाख 67 हजार 424 रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - पोलिसाच्या बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस वसाहतीत ही चोरी झाली असून दुसऱ्या पोलिसाच्या मुलाने हा प्रताप केला आहे. सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी या पोलिसपुत्र चोराला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तब्बल 4 लाख 67 हजार 424 रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. 

याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी सुबोध साभाजी माळगावकर (वय 33) यांची खोली आहे. त्यांची खोली अलीकडे बंद होती. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात संशयित ओंकार राजू माळगे (वय 22, सध्या रा. पोलिस वसाहत, मूळ रा. कोल्हापूर, हुपरी) याने पोलिस कर्मचारी सुबोध साभाजी माळगावकर यांची हरविलेली चावी वापरून कुलूप खोलून आतमध्ये प्रवेश केला. त्याने सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे गंठण, चांदीचे जोडणे असे मिळून तब्बल 4 लाख 67 हजार 424 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. 

हा प्रकार 22 रोजी सुबोध साभाजी माळगावकर आल्यावर उघड झाला. याबाबत त्यांनी याच दिवशी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यात अधिक तपास केला असता पोलिस वसाहतीत राहणाऱ्या ओंकार राजू माळगे याच्यावर पोलिसांचा तपास बळावला. त्यामुळे त्याला 23 रोजी अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ओंकार याला मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत 
संशयित ओंकार याने चोरलेल्या 4 लाख 67 हजार 424 रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी पोलिस यंत्रणेला आतापर्यंत 3 लाख 47 हजार 498 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. उर्वरित माल कुठे ठेवला आहे? कोणाला विकला आहे? याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती तपासिक अधिकारी उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी दिली. 

कसाल येथे शोधाशोध 
संशयित ओंकार याने कसाल येथील जंगलात चोरीचा मुद्देमाल लपविला असल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यामुळे पोलिस यंत्रणेने मोठा फौजफाटा घेत तसेच श्वान घेऊन तेथील जंगलात 23 व 24 रोजी मोहीम राबविली. यामुळे ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोचली; अन्यथा वाच्यता न करता पोलिस कार्यवाही पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होते. 

- संपादन - राहुल पाटील
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at Oros sindhudurg district