कोकणात एक कोटीच्या हाऊसबोटीला प्रतीक्षा चालविणार्‍यांची

राजेश कळंबटे
गुरुवार, 31 मे 2018

केरळमध्ये हाऊसबोट तर काश्मिरमध्ये पर्यटकांसाठी शिखारा बोट प्रसिद्ध आहेत. खाडी किंवा तलावामध्ये उभ्या केलेल्या हाऊसबोटीतून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसीकडून पावले उचलण्यात आली आहेत.

रत्नागिरी - कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाऊसबोटीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला; मात्र एक कोटीची अत्याधुनिक बनावटीची नौकाही कोकणात दाखल झाली होती. पण ती चालविण्यासाठी कोकणातून कोणीच तयार होत नसल्याने आता मुंबई, पुण्यातील व्यावसायिकांचा हात धरावा लागणार आहे. तिसर्‍यावेळी प्रसिद्ध केलेल्या निविदेला मुंबईतून एक प्रस्ताव आला आहे. त्यावरच बाणकोट आणि दाभोळ येथील हाऊसबोट पर्यटकांसाठी खुली करता येणार आहे.

केरळमध्ये हाऊसबोट तर काश्मिरमध्ये पर्यटकांसाठी शिखारा बोट प्रसिद्ध आहेत. खाडी किंवा तलावामध्ये उभ्या केलेल्या हाऊसबोटीतून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसीकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी हाऊसबोट ही संकल्पना कोकणात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तारकर्लीत त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. रत्नागिरीतही तसा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी बाणकोट, दाभोळ खाडीत एक कोटीच्या बोटी आणण्यात आल्या आहेत. या बोटीत वास्तव्य करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एका दिवसासाठी किमान आठ हजार रुपये भाडे त्या कुटुंबाला द्यावे लागणार आहे. त्या हाऊसबोटीवर दोन रुम आहेत. जेवणासह सर्व व्यवस्था केली आहे. किमान दहा तास या बोटीतून जलप्रवासाचा अनुभव घेण्याची अट ठेवली गेली आहे.

बाणकोटसह दाभोळमध्ये खाडीतून प्रवास करताना आजूबाजूचा निसर्गही पर्यटकांना पाहता येणार आहे. या बोटींसाठी जगप्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील गणपतीपुळेची निवड करण्याऐवजी नवीन पर्यटनस्थळांची विचार केला गेला आहे. त्या ठिकाणी पर्यटक जावेत असा उद्देश ठेवल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ही नौका चालविण्यासाठीचे भाडे तीस लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आले. त्यामुळे पहिल्या दोनवेळा काढलेल्या निविदेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. फेरीबोट चालविणार्‍या काही संस्थांशी चर्चाही झाली. पण धोका पत्करण्यास कोणीच तयार नसल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.

“दोनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. काही स्थानिक व्यावसायिकांशीही चर्चा केली; पण हाऊसबोट चालविण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. तिसर्‍या निविदा प्रक्रियेवर कार्यवाही सुरू आहे.” - जगदीश चव्हाण, जिल्हा पर्यटन अधिकारी
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There is no one to run one crore house boat in Konkan