
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बॅगेमध्ये 7 हजार रुपये व कागदपत्रे असा मुद्देमाल होता.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील गवळी तिठा परिसरात नेत्रचिकित्सकाकडे आलेल्या कुडाळ येथील दाम्पत्याची हॅण्डबॅग चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. ती बॅग घेऊन जाणारे दोघेजण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याबाबतची तक्रार औदुंबर नारायण मर्गज (वय 69 रा. पांगरड-कुडाळ) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बॅगेमध्ये 7 हजार रुपये व कागदपत्रे असा मुद्देमाल होता.
मर्गज हे पत्नीसमवेत कुडाळ पांग्रड येथून गवळीतिठा परिसरातील एका नेत्रचिकित्सकाकडे आले होते. यावेळी त्यांनी बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवली होती. यानंतर ते बाजूच्या एका दुकानाकडे गेले व पुन्हा जागेवर आले असता त्यांना खुर्चीत बॅग दिसली नाही. याबाबत त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासणी केली असता दोघेजण ती बॅग घेत असल्याचे दिसून आले.
दवाखाना, दुकान आणि परिसरातील लोकांजवल त्यांनी चौकशी केली असता काही निष्पन्न झाले नाही. यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ प्रा. गणेश मर्गज यांच्यासह येथील पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. चोरी झालेल्या बॅगमध्ये सात हजार रुपये रोकड, लायसन्स व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती, असे तक्रारीत म्हटले आहे. तर संबंधित दोघे युवक हे 22 वयोगटातील असून ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. येथील पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता काही निष्पन्न झाले नाही. याबाबत पुढील तपास येथील पोलिस करीत आहेत.
संपादन - राहुल पाटील