तेरा नवे बाधित, ३३ सक्रिय कंटेन्मेंट झोन कुठल्या जिल्ह्यात वाचा.....

विनोद दळवी
Monday, 27 July 2020

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 675 व्यक्ती कमी झाल्या.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात नवीन 13 रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या 342 झाली आहे. आणखी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त संख्या 259 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 150 ठिकाणी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कंटेन्मेंट झोन करावे लागले आहेत. यातील सध्या 33 सक्रिय आहेत. यात सर्वाधिक कणकवली तालुक्‍यात 11 झोनचा समावेश आहे. 

जिल्ह्यात रविवारी (ता. 26) रात्री तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यातील एक सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल होता. अन्य दोनमध्ये एक कलमठमधील तर दुसरा नांदगाव येथील आहे. सोमवारी सकाळी आणखी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील तीन सावंतवाडी तालुक्‍यातील आहेत. मळगाव, इन्सुली आणि बांदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. चौथा रुग्ण एसएसपीएम मेडिकल कॉलेज येथील आहे; मात्र एसएसपीएममधील रुग्णांची गावे समजू शकलेली नाहीत. सायंकाळी आलेल्या आठ रुग्णात कणकवली शहर 4, जानवली 3 तर सावंतवाडी तालुक्‍यातील कारिवडे येथील एकजण आहे. 

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 46 नमुने मिळाले. त्यामुळे तपासणीसाठीच्या नमुन्यांची संख्या पाच हजार 608 झाली. यातील पाच हजार 529 नमुने अहवाल आले. अजून 79 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील पाच हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित पैकी 259 रुग्ण बरे होऊन घरी परतले. सहा व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले. परिणामी जिल्ह्यात 77 रुग्ण सक्रिय आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 114 रुग्ण आहेत. यातील डेडिकेटेड कोविड जिल्हा रुग्णालयात 59 बाधित आणि 35 संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 4 तर कोविड केअर सेंटरमध्ये 8 बाधित आहेत. चार बाधित होम क्वारंटाईन आहेत. अजुन चार बाधितांची आयसोलेशन प्रक्रिया सुरु आहे. आज आरोग्य पथकाने तीन हजार 154 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 675 व्यक्ती कमी झाल्या. येथे 16 हजार 689 व्यक्ती आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 16 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या 66 झाली. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईन 675 व्यक्ती कमी झाल्याने तेथील संख्या 13 हजार 315 आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 31 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या तीन हजार 308 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने एक हजार 727 व्यक्ती दाखल झाल्याने दोन मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तीची संख्या एक लाख 53 हजार 480 झाली आहे. 

पडवे मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव 
कणकवली तालुक्‍यातील वागदे-सावरवाडी येथील साईपार्क अपार्टमेंट, 11 फ्लॅट, 11 कुटुंबे व 36 लोकसंख्येचा 50 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. जानवली येथील एक घर, एक कुटुंब व चार लोकसंख्येचा समावेश असणारा 50 मीटरचा परिसरही कंटेन्मेंट झोन केला आहे. कुडाळ तालुक्‍यातील कुडाळेश्वरवाडी, अर्थव प्लाझा कुडाळ हे केंद्र मानून अर्थव प्लाझापासून 50 मीटर क्षेत्रात कंटेन्मेंट झोन केला. पडवे येथील एस.एस.पी.एम. वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्ण मिळाल्याने येथील वैद्यकीय वसाहतपासून 100 मीटर क्षेत्राच्या हद्दीत झोन केला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये आठ ऑगस्टपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. 

पारकर कुटुंबीय होम क्वारंटाईन 
आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात बाधित झालेल्या संदेश पारकर यांच्या कुटुंबातील चार व्यक्ती बाधित आहेत. त्या चौघांवर घरीच उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानंतर प्रथमच होम क्वारंटाईन करून बाधित व्यक्तीवर उपचार करण्यात येत आहेत. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen newly affected, 33 active containment zones in which district .....