मुंबईहून सुट्टीसाठी आलेल्या वडील, मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यू

मुंबईहून सुट्टीसाठी आलेल्या वडील, मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यू

देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही घटना घडताना संबंधितांचे कुटुंबच तिथे उपस्थित होते.

जनार्दन संभाजी पांचाळ (वय 44), रोशन जनार्दन पांचाळ (14), ओंकार अनिल पांचाळ (16) अशी मृतांची नावे आहेत. प्रसाद पांचाळ (20) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन हे बालपणापासून मुंबईत वास्तव्याला असतात. ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करतात. पत्नी आणि मुलासह त्यांचे कायमचे वास्तव्य मुंबईतच असते. त्यांचे मुळ घर आंबवली सुतारवाडीत आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात काही दिवस ते या घरात सुट्टीनिमित्त येतात. 15 दिवसापूर्वीच हे कुटुंब आंबवलीत वास्तव्याला आले होते. आज सकाळी 8 वाजता जनार्दन हे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्‍वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत आंघोळ करून मग देवदर्शन करून घरी परतायचे असा त्यांचा बेत होता. सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर याठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही. यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले. आपण बुडत आहोत याची कल्पना येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. याच दरम्यान काठावर बसलेल्या कुटुंबीयांनी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा आधार देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ प्रसादच काठीच्या सहाय्याने काठावर आला. उर्वरित तिघेहीजण पाण्यात बुडाले.

काही मिनिटातच याची खबर गावात मिळाल्यावर असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. पोलिस पाटील अजित गोपाळ मोहिते यांनी याची खबर देवरूख पोलिसात दिली. पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह संगमेश्‍वरात नेण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, लाकुड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, सरपंच संतोष सावंत, माजी सरपंच दीपक सावंत यांच्यासह शामसुंदर पांचाळ, श्रीनाथ झगडे, अशोक पांचाळ, अनिल नांदळजकर आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यात हातभार लावला. घटनेची नोंद देवरूख पोलिसात करण्यात आली आहे.

नातेवाईंकानी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा
आपल्या डोळ्यादेखतच पती आणि मुलाला बुडताना पाहाण्याचे दुर्भाग्य जनार्दन यांच्या पत्नीला सहन करावे लागले. तिघेही बुडाल्यानंतर ते जिवंत असतील अशा आशेत त्या होत्या. मात्र काहीच तासात तिघांचेही मृतदेह बाहेर काढल्यावर त्यांनी फोडलेला हंबरडा सर्वांचे काळीज हेलावून टाकणारा ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com