esakal | केरळचा राजपक्षी कोकणच्या भूमीत दाखल; 'या' परीसरात आढळल्या 3 जोड्या
sakal

बोलून बातमी शोधा

‘ग्रेट हॉर्न बिल’

केरळचा राजपक्षी कोकणच्या भूमीत दाखल; 'या' परीसरात आढळल्या 3 जोड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी): देवभूमी केरळचा राजपक्षी असलेला ‘ग्रेट हॉर्न बिल’ पक्षी कोकणच्या भूमीत खेड येथे पक्षी मित्रांच्या दृष्टिपथात आला असून येथील वनराईमध्ये त्याने दाखल झाल्याची वर्दी दिल्याने पक्षीमित्रांना त्याची छबी कॅमेराबद्ध करण्याची उत्सुकता लागली आहे.

हॉर्न बिल या पक्षी समुहामधील राखाडी व काळ्या रंगाचे हॉर्न बिल या पक्ष्यांनी कोकण हे आपले घर आधीच करून ठेवले आहे; मात्र ग्रेट हॉर्न बिल हा दुर्मिळ पक्षी कधीतरी दृष्टिपथात येत असल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले. त्याने कोकणात दिलेली वर्दी ही सुखावणारी बाब मानली जात आहे. सुकीवली, कुडोशी, तळे, रसाळगड या परिसरात ३ जोड्या आहेत.

हा अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात. खेडमधील वर उल्लेख केलेल्या भागात उंच झाडे अन जंगल आहे. गेले ३ महिन्याहून अधिक काळ या जोड्या येथे पाहायला मिळतात, असे त्या भागातील लोकांनी सांगितले. देवभूमी केरळचा देखणा ग्रेट हॉर्न बिल हा कोकणात दाखल झाल्याने त्याला पाहण्यासाठी पक्षी मित्रदेखील आतूर झाले आहेत.

याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांच्या नर-मादीने खेडसारख्या ठिकाणी दाखल होऊन दर्शन दिले आहे. त्याची भारदस्त चोच अंगावर पिवळसर पट्टे व काळ्या ग्रे रंगाचा असलेला हॉर्न बिल अन्य हॉर्न बिलपेक्षा वेगळा दिसतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे.

झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो. भारतात धनेशाच्या पाच ते सहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून, सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमीवर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात.

हेही वाचा: महाविकास आघाडीतील नेते मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

ज्या ठिकाणी जंगल टिकून आहे त्या ठिकाणी हे पक्षी आढळून येतात. त्यामुळे जंगलतोड करू नका. जुनी आणि उंच झाडे तोडू नका. पक्षी आणि निसर्गाचा समतोल आपल्याला राखायचा असेल तर जंगलतोड थांबवणे गरजेचे आहे.

- डॉ. विनया जंगले, प्राणी-पक्षीमित्र

loading image
go to top