
-राजेंद्र बाईत
राजापूर : सातत्याने बदलणारे हवामान आणि तापमान, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक संकटांमध्ये अडकलेल्या आणि कोकणचं पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाला आता श्रीप्स किडीच्या प्रादुर्भावाच्या नव्या संकटाने घेरलं आहे. थ्रीप्स कीडीच्या अनेक जाती असून यापूर्वी आंबा, मिरची, तंबाखू यांसह फुलशेतीवर आढळून येणारी थ्रीप्स आता काजूपिकावरही आढळून येऊ लागला आहे. याला काजू अभ्यासक डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी पुष्टी दिली असून, काजूच्या अर्थकारणावर परिणामकारक ठरणाऱ्या या श्रीप्सच्या नव्या जातीसह त्याला अटकाव करणाऱ्या उपायोजनांसोबत काजूची नवी जात निर्मितीबाबत सखोल संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.